Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राहुल नार्वेकर विरोधकांचे लक्ष्य; विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या चार आठवड्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास उद्या, सोमवारपासून सुरुवात होत आहे. कांदा, धान, सोयाबीन, कापूस आदी प्रश्न गाजण्याची चिन्हे असतानाच मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी केलेली अडवणूक आणि अलिबागमधील जमीन मोजणीच्या वेळी झालेल्या प्रकारावरून विरोधक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लक्ष्य करणार आहेत. पुणे घाट तसेच मुलुंडमधील अपघातांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.

राज्य विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यावर दिवसभर चर्चा केली जाईल. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा विषय आमदार रोहित पवार हे उपस्थित करणार आहेत. प्रत्यक्ष कामकाजाला मंगळवारपासून सुरुवात होईल.

सत्ताधार्‍यांचे प्रचंड बहुमत व त्या तुलनेत विरोधकांचे कमी संख्याबळ यामुळे गेल्या वर्षभारातील तिन्ही अधिवेशनांत सत्ताधार्‍यांचा वरचष्मा राहिला होता, तरीही प्रश्न विचारण्यावरून तसेच लक्षवेधींच्या संख्येवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे टीकेचे लक्ष्य झाले होते. लक्षवेधीच्या वाढत्या संख्येवरून मंत्र्यांनीही चिंता व्यक्त केली होती. प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले जातात या शिवसेना गटनेते भास्कर जाधव यांच्या आरोपामुळे खळबळ उडाली होती.

हेही वाचा –  राज्यभरात 1 मार्चपासून दूध महागणार, प्रतिलिटर दरात नेमकी किती होणार वाढ?

या अधिवेशनात विरोधकांकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घेरण्याची व्यूहरचना आखली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी घरातील तीन जण बिनविरोध निवडून यावेत म्हणून नार्वेकर यांनी पालिका कार्यालयात उपस्थित राहून दमदाटी केल्याचा आरोप झाला होता. त्याची चित्रफीतही समाजमाध्यमात प्रसारित झाली होती. यापाठोपाठ अलिबागमध्ये जमीन मोजणीवर शेतकर्‍याने आक्षेप घेताच नार्वेकर यांनी तेथून पाय काढल्याची चित्रफीत समोर आली होती. या दोन्ही घटनांवरून नार्वेकर यांना विरोधक जाब विचारणार असल्याचे शिवसेना गटनेते भास्कर जाधव यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्षपदाचा आब नार्वेकर यांनी धुळीस मिळविल्याचा आरोपही जाधव यांनी केला. विरोधकांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या प्रस्तावावर नार्वेकर यांनी गेल्या वर्षभरात काहीच निर्णय घेतलेला नाही. यातूनच विरोधक नार्वेकर यांना धारेवर धरण्याची संधी सोडणार नाहीत.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अर्थ खाते हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे. यंदा ६ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प फडणवीस हे मांडणार आहेत.

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर टँकर उलटल्याने ३२ तास वाहतूक बंद पडणे, मुलुंड येथे मेट्रोच्या कामाचा भाग कोसळणे अशा विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. पायाभूत सुविधांचे जाळे विणले म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीरातबाजी करतात, पण पुणे व मुलुंडमधील अपघातांमुळे ही कामे कशी फोल ठरत आहेत यावर विरोधक जोर देणार आहेत.

’कापूस, धान, कांदा, सोयाबीन असे कृषी विभागाशी संबंधित विषय चर्चिले जातील. गेल्या वर्षी अवेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत जाहीर करण्यात आली असली तरी ही मदत शेतकर्‍यांना मिळालेली नाही.

’२०१७च्या कर्जमाफीचा लाभ अद्याप सर्व शेतकर्‍यांना मिळालेला नाही. यावरून विरोधी पक्ष सरकारला जाब विचारणार आहेत. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर जून महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button