“पंतप्रधानांची रील म्हणजे जनतेचा अपमान!”; इटली दौऱ्यावरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

Rahul Gandhi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यातील व्हिडिओ आणि रिल्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतानाच, आता यावरून देशांतर्गत राजकारण कमालीचे तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या ‘मेलोडी’ चॉकलेट भेटीवरून जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान मोदी इटलीमध्ये रिल्स बनवून चॉकलेट वाटत आहेत. ही रील म्हणजे भारतीय नागरिकांचा अपमान असून, हे नेतृत्व नाही तर निव्वळ ‘नौटंकी’ आहे,” अशा तीव्र शब्दांत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान मोदींचे इटलीमध्ये जंगी स्वागत झाल्यानंतर जॉर्जिया मेलोनी यांनी आधी त्यांच्यासोबतचा एक सेल्फी आणि त्यानंतर मोदींनी त्यांना ‘मेलोडी’ चॉकलेटचा पुडा गिफ्ट दिल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
हेही वाचा
KKR चा मुंबईवर दमदार विजय, प्लेऑफच्या आशा कायम; ‘असं’ आहे कोलकातासाठी समीकरणांचं गणित!
पंतप्रधानांच्या या रीलवर आक्षेप घेत राहुल गांधी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “भारतात सध्या मोठे आर्थिक वादळ येत आहे. तेल, पेट्रोल, डिझेल आणि विमानासाठी लागणाऱ्या इंधनाचे भाव गगनाला भिडणार आहेत. देशात खतांची कमतरता भासू लागेल, खतांचे भाव वाढतील आणि यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसणार आहे.”
ते पुढे म्हणाले, “पंतप्रधानांनी देशवासीयांना सांगितले की सोने खरेदी करू नका, अधिक प्रमाणात वाहन चालवू नका आणि परदेशात जाऊ नका. आणि ते स्वतः मात्र हजारो, कोट्यवधींच्या विमानातून फिरत आहेत. परदेशात जाऊन इटलीच्या पंतप्रधानांना मेलोडी चॉकलेट खाऊ घालत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनवलेली ही रील भारतीय जनतेचा आणि नागरिकांचा अपमान आहे.”
‘एक्स’ पोस्टवरून भाजपवरही निशाणा
राहुल गांधी यांनी आपल्या ‘एक्स’ (ट्विटर) अकाउंटवरूनही या संदर्भात पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले, “देश आर्थिक संकटात आहे आणि आपले पंतप्रधान इटलीमध्ये चॉकलेट्स वाटत आहेत. एकीकडे देशातील शेतकरी, तरुण, महिला, मजूर आणि छोटे व्यावसायिक आक्रोश करत आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे हसत हसत रिल्स बनवत आहेत आणि त्यावर भाजप टाळ्या वाजवत आहे. हे नेतृत्व नाही, तर नौटंकी आहे.”





