breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

संभाजी भिडेंच्या ‘त्या’ विधानावरून पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत आक्रमक; म्हणाले..

मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी एक वादग्रस्त विधान केलं आहे. करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. यावरून विधानसभेत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, संभाजी भिडे नवाच्या गृहस्थाने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहिजे. अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर हा माणूस बाहेर कसा फिरू शकतो. यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? त्यामुळे कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहिजे.

हेही वाचा – पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कार्यान्वयीत करा! आमदार महेश लांडगेंची मागणी 

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन सरकारने उचित कार्यवाही करावी. तर याची नोंद घेतली आहे. चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचंही संभाजी भिडे म्हणाले.

देशामध्ये सर्वधर्मसमभावाचा उपदेश नकोच. अशा प्रकारचा उपदेश देणाऱ्या नेत्यांना राजकारणातून हद्दपार करावे. हिंदुस्थान हा जगाच्या पाठीवरील एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंचे शौर्य अफाट आहे. परंतु हिंदू स्वत:चा धर्म, कर्तव्य, जबाबदाऱ्या विसरला. हिंदुस्थानची फाळणी होऊन देश षंढ पुढाऱ्यांच्या हाती गेला आणि हिंदूंची व हिंदुस्थानची अधोगती झाली, असं संभाजी भिडे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button