Nobel Prize : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळणार शांततेचे नोबेल?
भारत एक महासत्ता होऊ शकतो
![Prime Minister Narendra Modi will get the Nobel Peace Prize?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/narendra-modi-780x470.jpg)
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या ९ वर्षांपासून मोदी जागतिक स्तरावर देशाचे नेतृत्व करत आहेत. आता शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी भारताचं नोबेल पुरस्कार समितीने कौतुक केलं आहे. त्यामुळे आगामी काळात कदाचित भारतीयांना नोबेल पुरस्काराशी संबंधित मोठी बातमी ऐकायला मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लॅदिमीर पुतीन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मोदी यांनी कोणतीही धमकी न देता युद्धाच्या परिणामांबद्दल कडक संदेश दिला. आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा नेत्यांची आवश्यकता आहे, असं नोबेल समितीचे उपनेते असल तोजे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार आहेत. पीएम मोदी हे अत्यंत विश्वासू नेते आहेत. मोदी शांतता प्रस्थापित करू शकतात. ते जगातल्या अशा नेत्यांपैकी एक आहेत जे शांततेसाठी स्वत:चं योगदान देत आहेत. मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सांगितलं की, हे युद्धांचं युग नाही, असं असल तोजे म्हणाले.
भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठं योगदान देत आहेत. भारताला शांततेचा वारसा लाभला आहे, त्यामुळे भारत महासत्ता होणार हे निश्चित आहे. युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदी सर्वात विश्वासार्ह नेते आहेत आणि ते जगभरात शांतता प्रस्थापिक करू शकतात, असंही तोजे म्हणाले.