“भारताची जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था”; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
साहसी जवान, शेतकरी, कामगार, वैज्ञानिक आणि अभियंत्यांच्या भूमिकेचं कौतुक करते
मुंबई : आज देशभरात ७४व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये सालाबादप्रमाणे होणाऱ्या पथसंचलनातील महाराष्ट्राचा चित्ररथ सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. यावेळी त्यांनी भारताचा सध्या वेगानं विकसित होत असलेल्या पाच बड्या अर्थव्यवस्थांमध्ये समावेश झाला आहे. यामागे केंद्र सरकारचे विशेष प्रयत्न कारणीभूत आहेत. कारण कोरोनाच्या काळात बऱ्याच क्षेत्रात चढउताराची स्थिती असल्यानं त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. त्यामुळं सरकारनं अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेसाठी पावलं उचलणं गरजेचं होतं. केंद्राच्या सर्वोदय या मिशनमुळं अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना मिळाली आहे. गेल्यावर्षी भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. जगातील अर्थव्यवस्थांच्या वाढीमध्ये अनिश्चितता असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं ही झेप घेणं महत्वाचं ठरलं आहे, असं राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
मी त्या साहसी जवानांचे विशेष कौतुक करू इच्धिते जे देशाच्या सीमांचे रक्षण करतात आणि कोणताही त्याग तसेच बलिदान करण्यासाठी तत्पर असतात. देशवासियांना अंतर्गत सुरक्षा पुरवणाऱ्या पॅरामिलिटरी फर्स तसेच पोलीस दलाच्या धाडसी जवानाचे देखील मी कौतुक करते, असं राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.
मी शेतकरी, कामगार, वैज्ञानिक आणि अभियंत्यांच्या भूमिकेचं कौतुक करते ज्यांची सामुहिक शक्ती आपल्या देशाला जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय तंत्रज्ञान या विचारांशी अनुरूप प्रगती करण्यासाठी सक्षम बनवते, असंही राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.