राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ जमिनींवरील २०११ च्या आधीची निवासी अतिक्रमणे नियमित होणार
![Pre-2011 residential encroachments on village and government lands will be regularised](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/eknath-shinde-780x470.jpg)
मुंबई : राज्य सरकार सर्वसामान्यांचा विचार करून कायमच नवनवीन घोषणांवर भर देत आहे. अशातच राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्य सरकार २०११ आधीच्या गावठाण आणि सरकारी जागेवरील अतिक्रमण असणाऱ्या अनधिकृत घरांना नियमित करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गावठाण आणि सरकारी जागेवरील अतिक्रमण यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत राज्य सरकारने या विषयावर चर्चा केली. त्यामुळे आता यासंदर्भात लवकरच शासन निर्णय प्रकाशित केला जाणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. गावठाण आणि सरकारी जागेवरील अतिक्रमण असणाऱ्या अनधिकृत घरांना नियमित केल्यास लाखो गोरगरिबांना, झोपडपट्टीधारकांना त्याचा लाभ होणार आहे. येत्या काही दिवसात यासंदर्भात सरकारकडून आदेश काढला जाणार आहे.
हेही वाचा – ‘खंडोबा माळ ते बर्ड व्हॅली चौकापर्यंत रस्ता दुरुस्त करुन सुशोभीकरण करा’; विशाल काळभोर
राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबतच्या धोरणाला न्यायालयाच्या निर्देशाला अधीन राहून महिन्याभरात अंतिम स्वरूप देण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकासमंत्री, विभागांचे सचिव उपस्थित होते.