मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात प्रवीण लोणकरला पुण्यातून अटक

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतर दोन आरोपी फरार आहेत. दरम्यान, आता याप्रकरणी फेसबूक पोस्ट करणाऱ्या शुभम लोणकर नावाच्या एका संशयित आरोपीच्या भावाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. प्रवीण लोणकर (२८) असं या आरोपीचं नाव आहे. दोघेही भाऊ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी एक फेसबुक पोस्ट शुबू लोणकर महाराष्ट्र या फेसबूक पेजवरून शेअर करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. शुबू हा अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील शुभम रामेश्वर लोणकर आहे, अशी माहिती पुढे आली होती. या दृष्टीने पोलीस तपास करत होते. या तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्या अकोट येथील घरी दाखल झाले. मात्र, घराला कुलूप होतं. शेजाऱ्यांकडे विचारपूस केली असता, दोघेही भाऊ पुण्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पुण्यातील घरी छापा टाकला. त्यावेळी शुभम लोणकर हा फरार असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. तसेच पोलिसांनी त्याचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक केली.
हेही वाचा – ‘व्होट जिहाद’च्या भितीने हिंदूंना गृहित धरणारे नेते खरंच हिंदू आहेत का?
दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी पोलिसांनी वांद्रे येथून दोघांनी अटक केली होती. आता पुण्यातून आणखी एकाला अटक केली आहे. गुरुमीत सिंग आणि धर्मराज कश्यप असं आधी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यापैकी गुरुमीत सिंग हा हरियाणाचा, तर धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. दोघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने गुरुमीत सिंगला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर धर्मराज कश्यप याची हाडासंदर्भातली एक चाचणी करण्याचे निर्देश दिले. आरोपी धर्मराज कश्यपने त्याचं वय कोर्टात १७ वर्षे असं सांगितलं. त्यामुळे न्यायालयाने याप्रकरणी त्याच्या वय निश्चितीसाठी हाडांची चाचणी करण्यासंबंधीचे निर्देश दिले. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याच्याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे.





