‘गोपीचंद पडळकरांना काळं फासा अन् एक लाख मिळवा’; कोणी दिली ऑफर?
![Prashant Pawar said that Gopichand Padalkar should get black dice and one lakh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/gopichand-padalkar-780x470.jpg)
मुंबई : भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा लांडगा असा उल्लेख करत टीका केली आहे. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. या वक्तव्यानंतर अजित पवार गटातील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, गोपींचद पडळकर यांना काळं फासा आणि एक लाख मिळवा, अशी घोषणा अजित पवार गटातील नेत्यानं केली आहे.
अजित पवार गटाचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार म्हणाले, पडळकर दिसतील तिथे भर चौकात जोड्यानं मारा. नंतर पडळकरांना काळं फासून नागपूरला येत एक लाख मिळवा. हे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना करत आहे.
हेही वाचा – ‘महिला आरक्षण राजीव गांधींचे स्वप्न, विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा’; सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया
पडळकरांची जागा दाखवल्याशिवाय ते सुधारणार नाहीत. नागपूरला आल्यावर पडळकरांना सोडणार नाही. पडळकरांनी नागपूरला येऊ नये. आल्यावर मार खाल्ल्याशिवाय जाणार नाहीत, असा इशाराही प्रशांत पवार यांनी दिला आहे.
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.