‘..कोणत्या पंतप्रधानांची हुकूमशाही नसते’; प्रणिती शिंदेंचं पंतप्रधान मोदींवर टीकास्र!
![Praniti Shinde said which Prime Minister does not have dictatorship](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/narendra-modi-and-praniti-shinde-780x470.jpg)
आम्ही आमदार आमच्या घरी, तुमच्यासाठी आम्ही नोकर आणि सेवकच
सोलापूर : लोकशाही ही लोकांची शाही असते… लोकांची हुकूमशाही असते, कोणत्या पंतप्रधानांची हुकूमशाही नसते. आम्ही आमदार आमच्या घरी असतो, तुमच्यासाठी आम्ही नोकर आणि सेवकच असतो, असा टोला काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावाला आहे. त्या सोलापूर येथे एका कार्यक्रमाला संबोधित करत होत्या.
काही दिवसांनी आम्ही घरोघरी जाऊन कुणाचं रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, अपंग दाखला किंवा जन्म दाखला, अशी सगळी कामं करणार आहोत. हेच ते हाथ से हाथ जोडो अभियान आहे. निवडणुका असो वा नसो, काँग्रेस आणि आम्ही तळागळात तुमच्यासोबत आहोत. तुमच्या सुख-दु:खात आम्ही सोबत असू, कदाचित निवडणुकांमध्ये आम्ही येणार नाही. पण सुखा-दु:खात तुम्हाला जेव्हा मदत हवी असेल तेव्हा आम्ही मदतीला धावून येऊ, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
आम्ही मदतीला नाही आलो, तर आमचा कान धरून आम्हाला खाली बसवा. तो तुमचा अधिकार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आणि लोकशाहीचा तो अधिकार आहे. कारण ही लोकांची शाही आहे, लोकशाही आहे. ही लोकांची हुकुमशाही आहे. कुणा पंतप्रधानांची हुकुमशाही नाही. आम्ही तुमचे नोकर आहोत. मी आमदार माझ्या घरी असेन. पण इकडे आम्ही तुमचे सेवक आणि नोकर आहोत. आम्ही तुमच्यापेक्षा मोठा नाहीत, हे तुम्ही कधी विसरू नका. घाबरू नका. ताठ मानेनं जगा, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.