हुजूरपागेतील साठीच्या युवतींचा ‘गुलाबी’ स्नेहमेळावा जल्लोषात साजरा
![Pink Snehamelava celebration of young women in Hujurpage](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/pimpri-chinchwad-780x470.jpg)
‘आनंद मनात आमच्या माईना’
पुणे : हुजूरपागा प्रशालेतील साठी उलटलेल्या युवतींचा स्नेहमेळावा प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. आपटे रोडवरील ‘कोहिनूर’ मध्ये गुलाबी रंगातील या युवतींनी खूप धमाल केली आणि आनंदाची अक्षरशः लयलूट केली.
या अफलातून कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी लीना, किशोरी, स्मिता राजहंस, स्मिता जोशी, वंदिता, मीना, अंजली बापट अनुराधा देशपांडे, माधवी कानडे, रसिका जोशी अशी आयोजन समिती तयार झाली आणि उत्तमरीत्या, सुनियोजितपणे एक भरगच्च रूपरेखा तयार करून कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. अंजलीने माधवीच्या मदतीने खेळाची जबाबदारी घेतली. अनुराधा आणि स्मिता जोशी ने दुसर्या एका खेळाची जबाबदारी घेतली. सभागृह सुशोभीकरणासाठी सर्व साहित्य अनुराधा घेऊन आली. मीनाने सुंदर भेटवस्तू घेऊन येण्याचे काम हाती घेतले. स्मिता हिशेबाचे काम पाहीन म्हणाली. तर वंदिता स्वागत व पैसे गोळा करण्याचे काम करीन म्हणाली.
लीना, किशोरी, रसिका यांनी स्वागत आणि प्रस्तावना तसेच सूत्रसंचालनाचे काम पार पाडले. वैयक्तिक सादरीकरणासाठी काही सख्यांनी उत्स्फुर्तपणे नावे दिली. अगदी ठरल्याप्रमाणे, ठरल्या वेळेला सभागृह गुलाबी रंगाच्या छटांनी भरून गेले. शाळा सोडून साधारण ४५ ते ५० वर्षे झाली. पण, प्रत्येकाच्या डोळ्यांत तेच प्रेम, तीच आपुलकी, तीच उत्सुकता, तोच आनंद आणि तीच निरागसता … शब्दांपेक्षा डोळे जास्त बोलके झाले !
औरंगाबादहून स्नेहल आणि अमेरिकेतून येऊन विदुला ने हजेरी लावली तेव्हा तर मैत्रीची व्याख्या क्षितिजा पल्याड गेली.
वैयक्तिक सादरीकरणात माधवी कानडे, स्मिता जोशी, संजू जोशी, स्मिता राजहंस, मीनल काळे, शुभदा आठल्ये, अनुराधा देशपांडे आणि स्वाती केळकर यांनी चार चांद लावले. पहिला खेळ सुरेल गाण्यांचा तर दुसरा खेळ आकडेमोडीच्या पळापळीचा…!
शेवटचा तास गप्पांचा म्हणजे “ती सध्या काय करते ?” चा !
प्रत्येकजण भरभरून बोलत होती. प्रत्येकीला ऐकल्यानंतर असे जाणवले, की प्रत्येक सखी एक स्वयंप्रकाशी चमकता तारा आहे. प्रत्येकीची माहिती ऐकताना अभिमान वाटत होता आणि प्रेरणा मिळत गेली.
शाला माता गीत आणि घोषणांनी सभागृह तर दणाणून गेले. शुभदा आठल्ये आणि विदुला यांनी सर्व मैत्रिणींसाठी स्पेशल भेटवस्तू आणल्या होत्या त्या स्वीकारताना “आनंद हातात आमच्या माइना हो माइना” असंच झालं अगदी ! त्यासाठी तर धन्यवाद हा शब्द अपूराच ठरावा अशी परिस्थिती आली.
‘पुन्हा लवकरच भेटूयात गं’ असा निरोप घेताना मनातील गलबल हुरहूर प्रत्येकीच्या आवाजात जाणवत होती. सर्व सगळ्यांनी साठी ओलांडली असली तरी शाळेतील आठवणींची साठवण मात्र मनाच्या कोपऱ्यात घर करून राहिली आहे याचाच प्रत्येक प्रत्येकीला आला.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Image-2023-03-03-at-13.42.09.jpeg)