पिंपरी-चिंचवड: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) युवक शहराध्यक्षपदी शेखर काटे
पुण्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याहस्ते नियुक्तीची घोषणा
![Pimpri-Chinchwad: NCP (Ajit Pawar Group) Youth City President Shekhar Kate](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Shekhar-Kate-780x470.jpg)
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) युवक शहराध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती शेखर काटे यांची नियुक्ती झाली आहे. तसेच, कार्याअध्यक्षपदी प्रसाद कोलते, प्रसन्न डांगे, तुषार ताम्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुण्यात केली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कांग्रेस अध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी नगरसेविका माई काटे, प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष विशाल वाकडकर व महाराष्ट्र प्रदेश संघटक विशाल काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. पिंपरी-चिंचवडमधील मोठा गट अजित पवार यांच्यासोबत आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी पुन्हा मोर्चेबांधणी करीत आहेत. पुण्यात जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात काटे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
राष्ट्रवादीचे माजी युवकाध्यक्ष इम्रान शेख यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचे पद रिक्त झाले. त्यांना शरद पवार गटाचे युवकाध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे युवक शहराध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, शेखर काटे यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि युवक प्रदेश पदाधिकारी विशाल वाकडकर, विशाल काळभोर यांनी काटे यांचे नाव लावून धरले होते.
काटे कुटुंबियांची दुसरी पिढी या निमित्ताने अजित पवार यांच्यासोबत राजकारणात एकनिष्ठ राहीलेली पहायला मिळत आहे. शेखर काटे यांचा मित्रपरिवार मोठा असून, शहरात युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.