बृजभूषण सिंह यांची आरोप करणार्या कुस्तीपटूंविरोधात याचिका दाखल

कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक खेळाडूंविरोधात एफआयआर दाखल
मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात विनेश फोगाट आणि इतर कुस्तीपटूंनी शोषणाचा आरोप केला. या अत्याचाराविरोधात देशभरातील अनेक स्तरातून या प्रकरणाचा निषेध केला जात आहे. मात्र आता कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी आरोप करणार्या कुस्तीपटूंविरोधात याचिका दाखल केली आहे.
आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंविरोधात कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सिंह यांनी विनेश फोगाट आणि साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटूंची नावे आरोपी म्हणून नमूद केली आहेत.
कुस्तीपटूंनी लैंगिक छळ कायद्याचा गैरवापर करून न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवल्याचे सिंह यांनी याचिकेत म्हटलं आहे. त्यांनी कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक खेळाडूंविरोधात एफआयआर नोंदवण्यात यावी, अशी मागणी बृजभूषण यांनी केली आहे.
दरम्यान, डब्लूएफआय आणि त्याच्या प्रमुखाच्या विरोधातील सर्व आरोपांची सखोल चौकशी केली जाईल. तोपर्यंत बृजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावरून दूर केले जात आहे. चौकशी होईपर्यंत सिंह हे अध्यक्षपदाच्या दैनिक कार्यापासून दूर राहतील आणि चौकशीला सहकार्य करतील, असं क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे.




