breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पार्थ पवार यांचे ‘मिशन पिंपरी-चिंचवड’; नवीन शहराध्यक्षपदासाठी पाच नेत्यांची नावे चर्चेत!

दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने विविध मंडळांना लावली हजेरी

शहरात संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी प्रयत्न

पिंपरी । अविनाश आदक

लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणुकीनंतर भोसरी विधानसभा मतदारसंघातूनही मोठा धक्का सहन करावा लागला होता. कारण, भोसरी विधानसभेवर भाजपचे दोन टर्म आमदार महेश लांडगे असल्याने अजित गव्हाणे यांना विधानसभा लढविण्याची संधी नव्हती. त्यामुळे भोसरी विधानसभा लढविण्यासाठी अजित गव्हाणे यांच्यासह काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पिंपरी-चिंचवड शहरात झालेली पक्षीय पडझड दुरुस्त करण्यासाठी आणि शहरात आपले वर्चस्व पुन्हा निर्माण करण्यासाठी अजित पवार यांनी चिरंजीव पार्थ पवार यांना मैदानात उतरवल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहारात अगदी शांततेने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरवात केली आहे. शहरातील विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. त्याचबरोबर पत्रकार व जाणकारांच्या भेटीगाठीही ते घेत आहेत. काल झालेल्या दहिहंडी उत्सवाच्या निमित्तानेही पार्थ यांनी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला.

हेही वाचा    –    विधानसभा निवडणूकीत भाजपचं मिशन ‘सव्वाशे पार’?

पक्षसंघटना शहरात बळकट करण्यासाठी पार्थ पवार ऍक्टिव्ह झाले असून, पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदासाठी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर मंगला कदम, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ व माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांच्या नावांची चर्चा आहेत. हे सर्व नेते राष्ट्रवादी काँग्रेस व त्यातल्या त्यात अजित पवार यांचे अनेक वर्षांपासूनचे सहकारी आहेत. पक्षाला यांच्यापैकी शहराध्यक्ष मिळाला, तर शहर संघटना बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

विधान परिषदेवर कुणाला संधी?

दरम्यान, विधानसभा व विधानपरिषद स्तरावर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल आणि माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यपद देऊन पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्याचा अजित पवार प्रयत्न करतील, असे राजकीय जाणकार सांगतात. विलास लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने जाणकार नेते आहेत. तसेच, भोसरी व खेड विधानसभा मतदार संघावर महायुतीची पकड मजबूत करण्यासाठी त्यांचा प्रामुख्याने विचार जाऊ शकतो. त्याचबरोबर चिंचवड आणि पिंपरीतून नाना काटे व योगेश बहल यांनाही विधानपरिषदेवर संधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसे घडल्यास अजित पवार यांचा पारंपरिक बालेकिल्ला राहिलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा दबदबा निर्माण केला जाऊ शकतो त्यासाठी अजित पवार येत्या काळात काय प्रयत्न करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button