‘दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका’; पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
![Pankaja Munde said that if you want to drink alcohol, don't drink Hatbhatti](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Pankaja-Munde-780x470.jpg)
Pankaja Munde : गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. तसंच गोपीनाथ गडावर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याला भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी रक्तदान करताना कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना अजब सल्ला दिला.
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त १२ डिसेंबर या दिवशी दरवर्षी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोपीनाथ गडावर जमतात. या सर्वांनी यावेळी आपआपल्या गावात आपल्या आवडीप्रमाणे जयंती साजरी करावी. तसंच गोपीनाथ मुंडे यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवावं असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.
हेही वाचा – ‘कलम ३७० परत आणता येईल, त्यासाठी..’; फारूख अब्दुल्ला यांचं मोठं विधान
गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न जनतेसाठी होतं, त्यासाठीच त्यांनी मला तुम्हा सगळ्यांच्या ओटीत टाकले आहे. गोपीनाथ मुंडे १०० वर्षे जगावेत असं तुम्हाला आणि आपल्याला सगळ्यांनाच वाटत होतं. मात्र गोपीनाथ मुंडे जगू शकले नाहीत. मी प्रभू वैद्यनाथाला अभिषेक केला, बुद्ध विहारात जाऊन प्रार्थना केली. हजरत मलिकशाह दर्गा या ठिकाणी चादरही चढवली आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी प्रार्थना केली. माझे बाबा (गोपीनाथ मुंडे) आज आपल्यात नसले तरीही त्यांचे विचार आणि संस्कार आजही आपल्यात आहेत, पंकजा मुंडे म्हणाल्या.
दारु प्यायची असेल तर हातभट्टी पिऊ नका. त्याने विषबाधा होते. मी पिण्याला नाही म्हणत नाही. तंबाखू आणि पुड्या खाणं बंद करा आणि खाऊन कुठेही थुंकू नका. त्याने कॅन्सर होतो. तंबाखू पुड्या खाऊन तुम्ही मंदिराजवळ थुंकता, कसं दिसतं ते? यापुढे तंबाखू-पुड्या खाऊ नका. तसेच चांगलं चांगलं खा. मास-मच्छी, व्हेजिटेरियन खा आणि निरोगी राहा, असा अजब सल्ला पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला.