..पण मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल? पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य
![Pankaja Munde said how can anyone like that I have become a hero](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Pankaja-Munde-780x470.jpg)
Pankaja Munde | लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं आहे मात्र महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. मात्र, हा पराभव पंकजा मुंडे यांच्या जिव्हारी लागल्याने आतापर्यंत दोन कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर पंकजा मुंडेंनी त्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचं सात्वन केलं. यावेळी बोलतना त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, निवडणुकीत पराभव झाला म्हणजे मी संपले का? निवडणुकीत पराभव झाला म्हणजे संपले असं होत नाही. मला किती मतदान झालं आहे. या देशात पहिल्या पाचमध्ये मला मते पडली आहेत. ६ लाख ७७ हजार मते पडली आहेत. अजून ३ हजार मते पडली असती तर मी निवडून आले असते. मी निवडून आले असते तर हिरो झाले असते. पण मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल? असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानाचा रोख नेमका कुणाकडे आहे. याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
हेही वाचा – ‘अजित दादांना हाती घेऊन शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न’; बच्चू कडूंचं विधान
आता आक्रोश सुरू आहे. पण मी काय उत्तर देणार? आता जे चाललं आहे हे यासाठी चाललं आहे की, २०१९ च्या निवडणुकीत माझा पराभव झाला. पाच वर्ष पंकजा मुंडे यांच्याबरोबर आम्ही (कार्यकर्त्यांनी) वनवास भोगला. आता पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे माझं आता काही होणार नाही, अशी भावना लोकांची झाली आहे. मला काहीतरी द्या, यासाठी माझी लढाई नव्हती. लोकसभेचं तिकीट जाहीर झाल्यानंतर मला कळलं की मी लोकसभा लढणार आहे. मी लोकसभेची निवडणूक लढवावी हे पक्षाने जाहीर केलं. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील आणि देशाचं चांगलं होईल या भावनेतून मी लोकसभेची निवडणूक लढवली, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
आता सगळं सोडून घरी बसायचं असलं तरी विधानसभा झाल्याशिवाय काही करायचं नाही. पहिल्यावेळी पाच वर्ष वाट पाहावी लागली, पण आता विधानसभेला फक्त तीन महिने राहिले आहेत. त्यामुळे जीव लावून काम करा आणि इशाऱ्याकडे लक्ष ठेवा. आधी ५ वर्ष वाट पाहावी लागली. आता तीन महिने वाट पाहा, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.