पंढरपूर येथील धनगर आरक्षण आंदोलनाची तीव्रता अधिक वाढू लागली
सहा उपोषणकर्त्यांपैकी पाच जणांची प्रकृती बिघडली
![Pandharpur, Dhangar, reservation, agitation, intensity, increased,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/dhangar-780x470.jpg)
पंढरपूर : पंढरपूर येथील धनगर आरक्षण आंदोलनाची तीव्रता अधिक वाढू लागली आहे. सहा उपोषणकर्त्यांपैकी पाच जणांची प्रकृती बिघडली आहे. तर योगेश धरम यांना चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या धरम यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
मागील सात दिवसांपासून सहा जणांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. योगेश धरम यांना चक्कर आल्याने ते कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य उपोषणकर्त्यांचीही प्रकृती बिघडली असून, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
धनगर आरक्षण शिष्टमंडळात फूट
मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या शिष्टमंडळातील दोन सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे धनगर समाजाच्या शिष्टमंडळामध्ये फूट पडल्याचे दिसून आले. आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला असून, मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात येऊन प्रत्यक्ष आंदोलकांशी चर्चा करावी, अशी मागणी केली आहे. या निमित्ताने धनगर समाजाच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.
धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपुरात राज्यव्यापी बेमुदत उपोषण आंदोलन पुकारण्यात आले आहे. आंदोलनाची दखल घेऊन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत धनगर समाजाच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती.
या शिष्टमंडळामध्ये पंढरपूर येथील आदित्य फत्तेपूरकर व विठ्ठल पाटील यांचा समावेश होता. परंतु त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन ही केले. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाबरोबर चर्चा न करता, पंढरपुरात येऊन आंदोलकांशी चर्चा करावी, अशी मागणी केली. यावेळी उपोषणस्थळी धनगर समाज बांधवांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शिष्टमंडळातील दोन सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
प्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मी आणि विठ्ठल पाटील यांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सरकारने अनेक आश्वासने दिली आहेत. त्यामुळे आमचा सरकारवर विश्वास नाही. त्यामुळे आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात येऊन आंदोलकांशी चर्चा करावी.
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक आहे. धनगर समाजाची भूमिका नाही. आमच्यामध्ये कोणतेही वाद किंवा मतभेद नाहीत. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी दहा जणांचे शिष्टमंडळ तयार केले होते. त्यामध्ये त्यांचा समावेश होता. त्यांनी बैठकीला यावे किंवा नाही हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. परंतु बहिष्कार टाकून वेगळा निर्णय जाहीर करणे हे योग्य वाटत नाही.