breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे ठेवावीत, तरच…”, भाजपाच्या महिला मंत्र्यांचं खळबळजनक विधान

नवी दिल्ली |

शिवराजसिंह चौहान सरकारमधील मंत्री आणि मध्य प्रदेशातील महूच्या आमदार उषा ठाकूर या कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आताही उषा ठाकूर यांनी संपूर्ण जगाला भगवं करण्याचं एक नवं अजब सूत्र सांगितलं आहे. “सद्यस्थितीतील वाढते धोके पाहता प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे-अस्त्रे ठेवली पाहिजेत”, असं विधान उषा ठाकूर यांनी केलं आहे. तर पुढे त्या म्हणाल्या कि, “भगवा हा शांतीचं प्रतीक आहे. त्यामुळे, जर संपूर्ण जग भगवं झालं तर सगळीकडे आनंदाचं आणि शांततेचं वातावरण असेल.” भोपाळमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना उषा ठाकूर यांनी ही विधानं केलं आहे.

भोपाळ येथे मंगळवारी राजपूत महिला शाखेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उषा ठाकूर बोलत होत्या. “सर्वांचे पूर्वज एकच आहेत” या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर उषा ठाकूर म्हणाल्या की, “ऐतिहासिक पुरावे हे सिद्ध करतात की खरंतर सर्व पूर्वज हिंदूच होते. जर तुम्ही गेल्या चार-पाच पिढ्यांचा अभ्यास केलात तर तुम्हाला स्वतःलाच हे लक्षात येईल.” पुढे वैद्यकीय अभ्यासक्रमात संघाची विचारधारा शिकवण्याच्या प्रश्नावर देखील उषा ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • “नियमित पूजा-हवन केलंच पाहिजे”

“प्रेरणादायी लोकांबद्दल शिकवणं हे चुकीचं कसं असू काय शकतं? भगवीकरण हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. हे त्याग आणि बलिदानाचं प्रतीक आहे”, असं त्या म्हणाल्या. त्याचसोबत, यावेळी “मुलांना संस्कार देण्यासाठी आणि कुटुंबाला उत्तम आरोग्य देण्यासाठी, आध्यात्मिक शिक्षण आणि नियमित पूजा-हवन केलंच पाहिजे”, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. खरंतर सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे, उषा ठाकूर या अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अलीकडेच, त्यांनी अशी अनेक विधानं केली आहेत.

  • “भारताची ओळख गायीमुळे”

सेल्फीच्या बदल्यात पैसे देण्याबाबतच्या वक्तव्यामुळे यापूर्वी उषा ठाकूर सोशल मीडियावर मोठ्या टीकेच्या धनी झाल्या होत्या. “ज्यांना तुमच्यासोबत सेल्फी काढायचा आहे, त्यांना मोबदल्यात पैसे द्यावे लागतील”, असं त्यांनी म्हटलं होतं. त्याचसोबत, गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याच्या मागणीला देखील त्यांनी पाठिंबा दिला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या गोमांसाबाबतच्या वक्तव्याबद्दल देखील त्यांनी आनंद व्यक्त केला होता. “भारताची ओळख गायीमुळे झाली आहे. आपल्या संस्कृतीत गायीची पूजा केली गेली आहे. त्यामुळे तिला खाण्याची परवानगी देऊ नये”, असं त्या म्हणाल्या होत्या.

  • करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी यज्ञ करा!

इतकंच नव्हे तर यापूर्वी उषा ठाकूर यांनी करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी यज्ञ करण्याचा सल्ला दिला होता. यज्ञ करणं ही भारताची सनातन आणि पुरातन परंपरा असल्याचं सांगत ठाकूर यांनी किती वाजता यज्ञ केला पाहिजे हे सुद्धा सांगितलं होतं. “यज्ञ केल्याने करोनाची तिसरी लाट भारताला स्पर्शही करणार नाही. करोनाच्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने सर्व तयारी केली आहे. सर्व प्रयत्न करुन आम्ही ही साथ आटोक्यात आणू. सर्वांनी पर्यावरण शुद्ध ठेवण्यासाठी यज्ञ करावं. आता १०,११,१२ आणि १३ तारखेला सकाळी १० वाजता यज्ञ करावा”, असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button