breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

एक-एक मत महत्त्वाचं, भाजप आमदार मुक्ता टिळक यांची स्ट्रेचरवरुन हजेरी

मुंबई : गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या भाजप आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांना मतदानासाठी विधान भवनात आणण्यात आलं आहे. पुण्याहून एअर लिफ्ट करुन त्यांना मुंबईत भल्या सकाळीच आणण्यात आलंय. राज्यसभा निवडणुकीत एकही मत वाया जाऊ नये, म्हणून भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. थोड्याच वेळात मुक्ता टिळक आपला मतदानाचा अधिकार बजावतील.

राज्यसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला आज सकाळी ९ वाजताच सुरुवात झाली आहे. आतापर्यंत (साडे दहा वाजेपर्यंत) १४३ आमदारांनी मतदान केलं आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सहाव्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना उमेदवार संजय पवार आणि भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यात रस्सीखेच आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपने जोरदार फिल्डिंग लावली आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या सर्व आमदारांना ‘हॉटेल ताज’ मध्ये ठेवलं होतं. मात्र आमदार जगताप आणि आमदार टिळक आजारी असल्याने हॉटेलमध्ये नव्हते. मतदानादिवशी सकाळी विधिमंडळात आणण्याचं नियोजन भाजपने केले. त्यानुसार सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास टिळक आणि आमदार जगताप यांना विधिमंडळात आणण्यात आले. मुक्ता टिळक यांना तर स्ट्रेचरवर बसून विधिमंडळात आणण्यात आलं होतं. त्यांच्यासोबत आमदार गिरीश महाजन होते.

निकालाबाबत प्रचंड उत्सुकता

आमदारांवरील नजरकैद, मतगणितांच्या बेरजा-वजाबाक्या, आरोप-प्रत्यारोपांची राळ आणि विजयाच्या दाव्या-प्रतिदाव्यांनंतर आज (शुक्रवारी) राज्यसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर महाविकास आघाडीचा वरचष्मा असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. अर्थात गणिती आकड्यांचे राजकीय अन्वयार्थ हे नेहमीच अपेक्षापेक्षा वेगळे असल्यामुळे संध्याकाळी हाती येणाऱ्या निकालांबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक मतदानाला मुकणार?

माजी मंत्री अनिल देशमुख आणि अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांना मतदान करू देण्यास न्यायालयाने मनाई केल्याने महाविकास आघाडीची दोन मते कमी झाली आहेत. मात्र, उमेदवार निवडून येण्याचा कोटाही त्यामुळे किंचित कमी झाला आहे. निवडणुकीमध्ये आणखी दोन आमदार अनुपस्थित राहिले, तर ४२ मतांचा कोटा हा ४ १वर येण्याची दाट शक्यता आहे. या शक्यतेचा सर्वाधिक फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो, असे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे कमी झालेली मते ही आघाडीचीच असल्याने आमच्यासाठी हे अधिक फायद्याचे असल्याचे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button