‘ओम बिर्लांची निवड सभागृहासाठी सन्मानाची बाब’; पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : भाजप खासदार ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा लाेकसभा अध्यक्षपदी निवड होणे ही सभागृहासाठी सन्मानाची बाब आहे. संपूर्ण सभागृहाच्या वतीने मी तुमचे अभिनंदन करतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांचेअभिनंदन केले.
१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची आज निवड झाली. या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” म बिर्ला यांची दुसऱ्यांदा पीठासीन अधिकारी म्हणून निवड होणे ही सभागृहासाठी सन्मानाची बाब आहे. संपूर्ण सभागृहाच्या वतीने मी तुमचे अभिनंदन करतो. आम्हाला खात्री आहे की, तुम्ही आम्हाला पुढील पाच वर्षांसाठी मार्गदर्शन कराल आणि लोकसभा सत्र सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मदत कराल.
यावेळी पंतप्रधान माेदी म्हणाले, “तुम्ही दुसऱ्यांदा लोकसभा अध्य़क्षपदी आहात, हे सभागृहाचे भाग्य आहे. मी तुमचे आणि या संपूर्ण सभागृहाचे खूप खूप अभिनंदन करतो. तुमच्या अध्यक्षतेखाली ही १८ वी लोकसभा देशातील नागरिकांची स्वप्नेही यशस्वीपणे पूर्ण करेल. आपली ही संसद १४० कोटी देशवासीयांच्या आशेचे केंद्र आहे. संसदेचे कामकाज, उत्तरदायित्व आणि आचरण आपल्या देशवासीयांच्या मनात लोकशाहीवरील निष्ठा अधिक दृढ करते.
हेही वाचा – ‘येवलेवाल्यापेक्षा बेक्कार शेरोशायरी आपल्याला येते’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल!
स्वातंत्र्याच्या ७० वर्षात जी कामे झाली नाहीत, ती तुमच्या अध्यक्षतेखालील या सभागृहामुळे शक्य झाली. लोकशाहीच्या प्रदीर्घ प्रवासात अनेक टप्पे येतात. काही प्रसंग असे असतात जेव्हा संधी मिळते. १७ व्या लोकसभेच्या यशाचा देशाला अभिमान वाटेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. १७ व्या लोकसभेत ओम बिर्ला यांच योगदान मोठे आहे. ओम बिर्लांनी १७ व्या लोकसभेत मोठे निर्णय घेतले. कोरोना काळातही ओम बिर्लांनी संसदीय काम थांबू दिले नाही. संसदीय कार्यप्रणालीला ओम बिर्लांनी कार्यशील बनवले, असेही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी नमूद केले.
१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजप खासदार ओम बिर्ला यांची बुधवारी निवड झाली. आवाजी मतदानाने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे के. सुरेश उमेदवार होते. त्यांचा पराभव झाला. १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर भाजप खासदार ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान झाले.