‘योग्यता नसताना नेते जेव्हा त्यांच्या मुलांसाठी तिकीट मागतात, तेव्हा समस्या निर्माण होते’; नितीन गडकरींचं सूचक विधान
Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच रोखठोक बोलत असतात. दरम्यान, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर परखड भाष्य केलं आहे. या संदर्भात बोलताना, योग्यता नसताना नेते जेव्हा त्यांच्या मुलांसाठी तिकीट मागतात, तेव्हा समस्या निर्माण होतात, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
नितीन गडकरी म्हणाले, मी कधीही घराणेशाहीचं राजकारण केलेलं नाही. माझ्या कुटुंबातील एकही सदस्य राजकारणात नाही. मी त्यांना सांगितले की माझ्या आई-वडिलांनी आणि मी जे काही कमावले ते त्यांचे आहे. पण माझ्या राजकीय वारशाचा हक्क हा माझ्या कार्यकर्त्यांना आहे.
हेही वाचा – अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ला, AK-47 ने गोळीबार
कोणत्या नेत्याचा मुलगा किंवा मुलगी राजकारण असणं हा गुन्हा नाही. पण जोपर्यंत तो त्याची योग्यता सिद्ध करत नाही, तोपर्यंत नेत्यांनी त्यांच्या मुलांसाठी तिकीट मागू नये. जर तो योग्य असेल आणि कार्यकर्त्यांचा त्याच्यावर विश्वास असेल, तर ते मुलासाठी तिकीट मागू शकतात. राजकारण गुणवत्ता असलेला व्यक्तीच पुढे जातो. पण केवळ राजकीय नेत्याचा मुलगा आहे, म्हणून त्याने राजकारणात येऊ नये, असं म्हणणंही चुकीचं आहे. असं म्हणून आपण त्याचा हक्क हिरावून घेतो. ते योग्य नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.
भारतात सर्वात मोठी लोकशाही आहे. लोकशाहीच्या चार स्तंभांमध्ये न्यायपालिका, मीडिया, विधिमंडळ आणि कार्यपालिका आहे. लोकशाहीत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असतो. गाडी किंवा ट्रेनच्या चाकांप्रमाणे दोन्ही महत्वाच्या आणि समतोल असणे आवश्यक असते. राजकारण हे सामाजिक-आर्थिक शक्तीचे साधन आहे. आपण एकत्र काम करणे आवश्यक आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले.