पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मतभेद आहेत का? नितीन गडकरी म्हणाले..
![Nitin Gadkari said that they present their issues by misinterpreting my speech](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Nitin-Gadkari-and-Narendra-Modi-780x470.jpg)
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामध्ये मतभेद असल्याची चर्चा वारंवार घडत असतात. या दाव्यांमागे नेमकं सत्य काय आहे? यावर खु्द्द नितीन गडकरींनीच खुलासा केला आहे. त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मतभेद असल्याचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. चुकीच्या पद्धतीने व्हिडीओ दाखवून आमच्यात मतभेद असल्याचे दावे केले जात असल्याचंही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले की, निवडक व्हिडीओ दाखवले जात आहेत. त्यातून आमच्यात विसंवाद असल्याचं सांगितलं जातं. अनेकांमध्ये मोदींवर थेट हल्ला करण्याची हिंमत नाही. त्यामुळे ते माझ्या बोलण्याचा गैरअर्थ लावून आपले मुद्दे मांडतात. कुणीतरी एकजण असं काहीतरी टाकतो. नंतर इतर माध्यमं त्याचा आधार घेऊन बातम्या देतात. आमच्यात कोणत्याही प्रकारचे तणाव नाहीत.
हेही वाचा – निवडणूक आयोगाने KYC अॅप केले लाँच; मतदाराला मिळणार उमेदवाराची संपूर्ण माहिती
आमचं बोलणंही होत असतं. माझा एक स्वभाव आहे. मी मला दिलेल्या कामात लक्ष देतो. मुंबईतही फारसा येत नाही. त्यांनी मला विचारलं तरी त्यावर फारसं मतप्रदर्शन करत नाही. मी त्यांना सांगतो तु्म्हाला जे योग्य वाटेल ते करा. पक्षानं दिलेलं काम व्यवस्थित करणं हेच आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असं नितीन गडकरी म्हणाले.
आमच्याकडे संसदीय समिती महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करते आणि त्यानंतर उमेदवारांची घोषणा केली जाते. पहिल्या यादीवेळी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व गुजरात या प्रदेशाच्या नेत्यांबरोबर ही पहिली चर्चा झाली. त्यामुळे तिथले उमेदवार जाहीर झाले. महाराष्ट्रात आमच्याबरोबर इतर पक्ष आहेत. त्यामुळे सगळ्यांची चर्चा करून संसदीय समितीसमोर जायला उशीर झाला. त्यामुळे माझं नाव दुसऱ्या यादीत आलं, असंही नितीन गडकरी म्हणाले.