‘२०२४ पर्यंत देशातील रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले करणार’; नितीन गडकरींचा दावा
![Nitin Gadkari said that the country's roads will be better than America by 2024](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Nitin-Gadkari-780x470.jpg)
मुंबई : भारताची अर्थव्यवस्था आणि वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकावर जाईल. तसेच महाराष्ट्रातील तर सोडाच, पण उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रस्तेही २०२४ पर्यंत अमेरिकेतील रस्त्यांपेक्षाही चांगले होतील, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, परिवहन विभागातील भ्रष्टाचार संपला असून सागरी विमानाने मुंबईतील समुद्रातून उडून जयपूरच्या तलावात आणि तेथून कोलकात्यालाही जाता येईल, हे दिवसही आता फार दूर नाहीत. मुंबई महापालिकेने सर्व विद्युत बसगाड्या चालविल्या, तर सध्याच्या एकतृतीयांश तिकीटदरातही नफा कमावता येईल.
हेही वाचा – Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अलर्ट
मुंबई-दिल्ली हे अंतर द्रुतगती महामार्गाने केवळ १२ तासांत कापता येईल. भांडवल उभारणीची आता विशेष अडचण नसून बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) आणि पीपीपी (सार्वजनिक व खासगी भागीदारी) माध्यमातून रस्ते, विमानतळ आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील शेकडो प्रकल्प राबविले जात आहेत, असं नितीन गडकरी म्हणाले.
वाहनांमध्ये इथेनॉलचा वापर वाढत असून इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा येत आहे. त्यांचे उत्पन्न वाढत आहे. संपूर्ण इथेनॉलवर चालणारी टोयोटाची नवी मोटार ऑगस्टमध्ये भारतात बाजारपेठेत दाखल होणार आहे. देशात विद्युत वाहनांची संख्या वाढत असून चार्जिग स्टेशनचा प्रश्न आता येत नाही. या वाहनांसाठी आता प्रतीक्षा यादी आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले.