‘..ही बाळासाहेबांची शेवटची इच्छा होती’; नितीन गडकरी यांचं विधान चर्चेत
![Nitin Gadkari said that Balasaheb's last wish was for Raj and Uddhav Thackeray to come together](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/nitin-gadkari-and-balasaheb-thackeray-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी याबाबत बॅनर्स देखील झळकले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. दोन्ही भावांबद्दल बाळासाहेबांची एक इच्छा अपूर्ण राहिली असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. ते अवधुत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले की, राज ठाकरेंचं व्यक्तीमत्व दिलखुलास आहे. राजकारण, राजकारणातील भूमिका वेगवेगळ्या असतात. राज शिवसेनेत होते, तेव्हापासूनच त्यांना नवनवीन गोष्टींचा ध्यास होता. त्यांनी घर बांधलं, त्या घरातील इंटिरियर मी बारकाईने पाहिलं. त्यांच्यामध्ये एक कलात्मकता आहे, ते प्रत्येक गोष्टी फार विचारपूर्वक प्लॅन करून करतात, त्यामुळे त्यात परफेक्शन असतं. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
हेही वाचा – ‘ना टायर्ड हूँ! ना रिटायर्ड हूँ!’ शरद पवारांचा अजित पवारांना खोचक टोला
बाळासाहेब जेव्हा लीलावती रूग्णालयात होते, तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो, त्यानंतर काही दिवसांनी त्यांचं निधन झालं. मी भेटलो तेव्हा त्यांनी मला बसायला सांगितलं आणि सगळ्यांना बाहेर पाठवलं. ते मला म्हणाले, नितीन एक काम कर उद्धव आणि राजमध्ये मैत्री कर. राज यांनी शिवसेना सोडू नये, यासाठी मी खूप प्रयत्न केले. मी उद्धव ठाकरेंनाही खूप वेळा समजावून सांगितलं, मी प्रयत्न केले पण दुर्दैवाने मला त्यात यश आलं नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.
राजकारणात काहीही होऊद्या, पण एक कुटुंब म्हणून आपण एकत्र असलो की आपली ताकद कितीतरी पटीने वाढते. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र राहून काम करावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. मला माहीत नाही की काळाच्या ओघात काय होईल, कारण राजकारणातून बरंच पाणी वाहून गेलंय. पण माझं बाळासाहेबांवर खूप प्रेम होतं. त्याचं माझ्यावर होतं. त्यांच्या निधनाआधीच ते बोलणं मला अजूनही लक्षात आहे. राजकारण वेगळं मैत्री वेगळी, राजकारण वेगळं संबंध वेगळे, यात अंतर ठेवूनच आपण वागायला हवं. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे योग्य नाही आणि ते करूही नये, असंही नितीन गडकरी म्हणाले.