‘गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा’; डॉ. नीलम गोऱ्हे
![Neelam Gorhe said to celebrate Ganeshotsav, Dahihandi festival with peace and enthusiasm](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/neelam-gorhe-780x470.jpg)
पुणे : गणेशोत्सव, दहीहंडी तसेच अन्य आगामी सण उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, त्यादृष्टीने सर्वं संबंधित यंत्रणा आणि मंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालय येथे आगामी काळात साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सव, दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात येणाऱ्या नियमावलीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, उपआयुक्त संदीप गिल व आर राजा, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, विभागीय उपायुक्त वर्षा उंटवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कासगावडे आदी उपस्थित होते.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी देण्यात आलेले परवाने सन २०२६ पर्यंत वैध असणार आहेत, त्यामुळे त्यांनी यावर्षी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या गणेशोत्सव मंडळांना यापूर्वी परवानगी घेतलेली नाही अशांनी नव्याने अर्ज करावे. नागरिकांनी आपल्या सूचना जिल्हाधिकारी, पुणे मनपा आणि पोलीस आयुक्त कार्यालय यांच्याकडे सादर कराव्यात. प्राप्त सूचनांवर प्रशासनाच्यावतीने सकारात्मक दखल घेऊन त्याचे निराकरण करण्यात येईल. दहीहंडी या सणाला साहसी खेळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या अनुषंगाने मुंबईच्या धर्तीवर सुरक्षितेतच्यादृष्टीने मंडळाला मार्गदर्शनपर जनजागृतीपर प्रात्यक्षिके घेण्याचे निर्देश देण्यात दिले आहेत.
हेही वाचा – छगन भुजबळांच्या ‘त्या’ विधानाचं काँग्रेसकडून समर्थन? विजय वडेट्टीवार म्हणाले..
#गणेशोत्सव, #दहीहंडी तसेच अन्य आगामी सण उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, त्यादृष्टीने सर्वं संबंधित यंत्रणा आणि मंडळांनी समन्वयाने काम करावे. प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुचनांचे नागरिकांनी पालन करत सहकार्य करावे-आढावा बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती @neelamgorhe pic.twitter.com/HYGb1yNqDJ
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 19, 2023
सणाच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राहील यादृष्टीने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूकीचे योग्य व्यवस्थापन करावे, त्यादृष्टीने वाहतूक कोंडीच्या जागेची पाहणी करावी. वाहतुकीतील बदलाबाबत नागरिकांना अवगत करावे. भाविकांना गणेशोत्सव व दहीहंडी बघता यावे यासाठी रस्त्याचा दोन्ही बाजू खुल्या ठेवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सुचनेनुसार गणेशोत्सव कालावधीदरम्यान २३, २४, २६, २७ आणि २८ सप्टेंबर या ५ दिवसी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाच्या वापरासाठी सवलत दिली आहे. गौरी विसर्जनाच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत विसर्जनाची सवलत दिली आहे. पुणे मनपाच्यावतीने बाहेरून येणाऱ्या भाविकासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
पुणे शहरातील सार्वजनिक मंडळाच्या प्रतिनिधी केलेल्या सूचनांच्या बाबतीत प्रशासनाच्यावतीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. गणेशोत्सव हा दरवर्षी सामाजिक भावनेतून साजरा केला जातो. प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुचनांचे नागरिकांनी पालन करत सहकार्य करावे, असे आवाहनही नीलम गोऱ्हे यांनी केले.
यावेळी प्रशासनाच्यावतीने उत्सव कालावधीत करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीबाबत पूणे मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी आदींनी माहिती दिली.