मनोज जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण? भाजपा नेत्याचा सवाल
![Narendra Patil said who is the owner of Manoj Jarange Patal's call](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Manoj-Jarange-Patil-1-780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं होतं. उपमुख्यमंत्र्यांचा आमच्याशी दगाफटका करण्याचा डाव असू शकतो, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, यावरून भाजप नेते नरेंद्र पाटील यांनी जरांगे-पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.
नरेंद्र पाटील म्हणाले, मनोज जरांगे पाटलांना काशाची भिती आहे, माहिती नाही. जरांगे पाटील सतत फडणवीसांवर व्यक्तिगत टीका करत आहेत. हे फार चुकीचं आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाली किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, याचा जरांगे पाटीलांना राग आहे का? जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण? असा सवाल उपस्थित केला.
हेही वाचा – मराठा आरक्षण : सकल मराठा समाजाच्या वतीने पिंपळे गुरव येथे एकदिवसीय उपोषण
बीडमधील जाळपोळीनंतर जरांगे पाटलांनी गृहमंत्र्यांबद्दल चुकीचे शब्द काढले. फडणवीस आणि भाजपाबाबत जरांगे पाटलांनी केलेलं विधान चुकीचं आहे. जरांगे पाटलांनी आंदोलनापर्यंतच मर्यादित राहावं, अशा शब्दांत नरेंद्र पाटलांनी जरांगे पाटलांना खडसावलं आहे.
मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
बीडमध्ये साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांना मारहाण करुन आणि अन्य आंदोलकांवर ३०७ चा गुन्हा दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना निवांत झोप आली असेल. उपमुख्यमंत्री जाणुनबुजून इंटरनेट बंद करत आहेत. त्यामुळे लोकांचा रोष वाढत आहे. या सगळ्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचा आमच्याशी दगाफटका करण्याचा डाव असू शकतो, असे लोकांना वाटत आहे. हा गंभीर आरोप वाटत असेल, पण मी हे थेट सांगत आहे. आम्ही उपमुख्यमंत्र्यांना भीत नाही. तुमचं करिअर बरबाद करायचं की चांगलं, हे मराठ्यांच्या हातात आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.