महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमूळे? नाना पटोलेंनी व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
![Nana Patole said that the death during Maharashtra Bhushan award was due to stampede](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/nana-patole-1-780x470.jpg)
मुंबई : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुंबईमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, भर दुपारी हा कार्यक्रम झाल्यामुळे उपस्थित श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यात १२ श्रीसदस्यांचा दुर्दौवी मृत्यू झाल्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमूळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय? तसेच या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतोय, असं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्वीट करत महत्वाची माहिती दिली आहे. काँग्रेस महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात काय घडलं यांची माहिती जनतेसमोर ठेवणार आहे. काँग्रेस पक्षातर्फे २४ एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेचे सत्य जनतेसमोर मांडणार आहोत, असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.