‘आरक्षणाची मागणी करणाऱ्या समाजात भाजप दुफळी निर्माण करतेय’; काँग्रेस नेत्याची टीका
![Nana Patole said that BJP is creating a faction in the society demanding reservation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Nana-Patole-780x470.jpg)
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने एका महिन्याच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं आहे. तर मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्याकडे सभा घ्यायला एवढा पैसा कुठून आला, असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
नाना पटोले म्हणाले, मराठा समाजात सरसकट आरक्षण आणि इतर असे दोन गट निर्माण झाले आहेत. अशाप्रकारे भाजप आरक्षणाची मागणी करणाऱ्या समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम करीत आहे. सत्ताधाऱ्यांनी हा खेळ थांबवून महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे.
हेही वाचा – नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गांपैकी शैलपुत्री देवीची पूजा का केली जाते?
सरकारनेच ही आग लावली, त्यांनाच ती विझवावी लागेल. जर समाजाला आश्वासन दिले तर ते पूर्ण का करीत नाही. त्यामुळे सत्तेत बसणाऱ्यांनी एकमेकांना प्रश्न विचारून हास्यजत्रा करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न मार्गी लावावे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दोन गट पडले. त्यातील एक गट सरसकट आरक्षणाची मागणी करीत आहे. सरकारने ही दुफळी माजवण्याचा खेळ चालवला आहे. सत्तेतील लोकांनी हा खेळ थांबवला पाहिजे. युवकाना भेडसावणारी कंत्राटी कर्मचारी भरती बंद करावी, असंही नाना पटोले म्हणाले.