‘भाजपाने आणि काँग्रेसने कितीही आपटली तरी वेगळा विदर्भ होणार नाही’; संजय राऊत

मुंबई | महाराष्ट्र विधानमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि काँग्रेसवर तीव्र टीका करत वेगळा विदर्भ होणार नसल्याचा ठाम दावा केला आहे. ‘भाजपाने आणि काँग्रेसने कितीही आपटली तरी विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होणार नाही’, असे शब्दांत त्यांनी स्पष्ट केले.
खासदार संजय राऊत म्हणाले, विधीमंडळातील कामकाजाचं गांभीर्य संपलं आहे. सध्या सर्कस सुरू आहे. संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यामुळे संसदेतील चर्चेत जान आहे. लोकशाही जिवंत असल्याचं एक भान आहे. संसदीय लोकशाहीमध्ये सभागृहात मग महानगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषदा असतील किंवा विधानसभा असेल, सभागृहात विरोधी पक्ष नेता असणं गरजेच आहे. संविधानाची देखील ती गरज आहे. मात्र, गेल्या १० वर्षांत विरोधी पक्ष नेता कुठे ठेवायचाच नाही, त्या अनुषंगाने निकालांची मांडणी करायची, हे मोदी आणि शाह यांच्या राजकारणाने ठरवलेलं आहे. पण तरीही यावेळी राहुल गांधींनी त्यांचे १०० खासदार निवडून आणले. तसेच आमचे काही खासदार, त्यामुळे सरकारला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद टाळता आलं नाही.
आता महाराष्ट्रा सारख्या राज्याला विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही. याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. विरोधी पक्षनेत्याशिवाय तुम्ही सभागृहाचं कामकाज पुढे नेत आहात याचा अर्थ तुम्ही विरोधी पक्षांना घाबरता. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणि दिल्लीत अमित शाह यांना लोकशाहीचे कोणतेही संकेत पाळायचे नाही असं दिसत आहे. याआधी देखील संख्याबळ कमी असतानाही दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते नेमलेले आहेत. संसदेत भाजपाची देखील कमी संख्या असताना विरोधी पक्ष नेता नेमलेला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
हेही वाचा : राज्यात मुलं पळवणाऱ्या टोळ्या सक्रिय; राज ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
महाराष्ट्राच्या लढ्यात गौतम अदाणी नव्हते. पण सध्या महाराष्ट्र आणि मुंबई गौतम अदाणीच्या पायाशी ठेवण्याचा प्रयत्न मिंधे आणि फडणवीसांचं सरकार करत आहे. संसदेत वंदे मातरम् चर्चा झाली, ‘जय जय महाराष्ट्र’वरही चर्चा होऊद्या, म्हणजे महाराष्ट्रासाठी कोणी रक्त सांडलं हे देशाला आणि राज्याला कळेल. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या लढ्यात कुठेच नव्हता आणि आज ते आम्हाला अक्कल शिकवतात? महाराष्ट्राच्या प्रश्नांवर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
आज मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे हे सांगतात की विदर्भ वेगळा करण्यासाठी आमचं काम सुरू आहे, हा आमचा आजेंडा आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस काम करत असल्याचं ते सांगतात. मात्र, यावर मिंधे गटाचा एकही आमदार बोलला नाही याचा अर्थ हे अमित शाहांचे मिंधे आहेत. बावनकुळे यांच्या वक्तव्यावर शिंदे गट शांत बसला आहे. इकडे पालघरमध्ये गुजरात पूर्णपणे घुसलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रावर आक्रमण होत आहे. पालघरच्या सीमा ओलांडून गुजरातने आत प्रवेश केला आहे, असा आरोप खासदार राऊत यांनी केला.
आम्ही याबाबत वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या भूमिकेला समर्थन देत नाहीत. कोणी कितीही आदळआपट केली तरी विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होणार नाही. भारतीय जनता पक्षाने कितीही प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. आता तर महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भूमिकेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आहेत. त्यामुळे जर कोणी हे स्वप्न पाहत असेल तर स्वप्नभंग होईल, असंही संजय राऊत म्हणाले.




