breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

मोदींनी महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर ठरवलं; संजय राऊत संतापले, म्हणाले “महाराष्ट्रातील भाजपाच्या एकाही नेत्याला…”

मुंबई |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर ठरवलं असल्याचं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. बुधवारी केलेल्या स्फोटक पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत यांनी गुरुवारीही दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण मुंबईत गेल्यानंतर सविस्तर बोलणार आहोत असं सांगितलं. तसंच आपल्यामागे राक्षस लावले जात असल्याची टीका केली आहे. “या देशाचा नागरिक, संसदेचा सदस्य, शिवसेनेचा नेता आणि बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून सत्य बाजू लोकांसमोर मांडण्याचा अधिकार आहे. जे काही बोलायचं होतं ते मी काल बोललो आहे. आता जे काही बोलायचं आहे ते मी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत जाऊन बोलणार आहे,” अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.

“कितीही खोटं बोला, दबावतंत्राचा अवलंब करा, पुरावे उभे करा, लोकांना धमक्या द्या, सरकार पाडण्याच्या धमक्या द्या पण शिवसेना आणि महाराष्ट्र या येड्यागबाळ्यांसमोर झुकणारा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत आणि आता शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा इतर नेते असतील..हा महाराष्ट्राचा बाणा आहे आणि राहील,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. “कोणाला गुडघे टेकायचे असतील, कोणाला महाराष्ट्राची लाज बाहेर काढायची असेल तर काढावी. काल त्यांनी तेच केलं ना…महाराष्ट्र करोनाचा सुपर स्प्रेडर? महाराष्ट्राने जगात सर्वोत्तम काम केलं. महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये, समुद्रांमध्ये बेवारसपणे प्रेतं नाही फेकली. किती खोटं बोल आहात आपण. महाराष्ट्रातील भाजपाच्या एका तरी नेत्याने यावर निषेध सोडा पण साधी नाराजी तरी व्यक्त करावी. हे तुमचं महाराष्ट्रप्रेम आणि हा तुमचा महाराष्ट्र बाणा,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“दिल्लीच्या दबावापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना देशाचा युगपुरुष मानलं जातं. या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. राजकारणाची नाव घेतात ते सोडून द्या, पण बाणा आमच्याकडे आहे,” अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली. शिवसेना मुंबईचा दादा आहे या वक्तव्यावरुन होणाऱ्या टीकेसंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “हो आहेच..यावरुन टीका करण्यात कारण काय? बाळासाहेब नेहमीच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातून मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि शिवसेना निर्मितीनंतर मुंबई महाराष्ट्रात राहिली नाहीतर कधीच बाहेर गेली असती. मुंबई ओरबाडण्याचे अजूनही प्रयत्न सुरु आहेत”. देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टात बोलावं असा सल्ला दिल्यासंबंधी सांगितलं असता ते म्हणाले की, “मी कोर्टात बोलणारच आहे. मी काल संसदेत मुद्दाम बोललो नाही. तिथे वीर सावरकरांचं गाणं गायल्याबद्दल ह्रदयनाथ मंगेशकरांना त्यांची नोकरी गमवावी लागली असं सांगण्यात आलं. मला कळायला लागल्यापासून मी ते ‘सागरा प्राण तळमळला’ गाणं आकाशवाणीवरुनच ऐकलं आहे. हे गाणं लोकप्रिय कऱण्याचं काम आकाशवाणीनेच केलं आहे. माणसाने किती खोटं बोलावं. घटनात्मक पदावरील व्यक्तीने तरी खोटं बोलू नये. पण मी त्यांना वंदन करतो”.

“माझ्या माहितीनुसार असं कुठेही रेकॉर्डमध्ये नाही. मी ऑल इंडिया रेडीओचे प्रमुख महेश केळुसकर यांचं निवेदन ऐकलं. त्यांनाही आश्चर्य वाटलं आहे. जर एखादं गाणं निर्माण केल्याबद्दल, गायल्याबद्दल एखाद्या संगीतकाराला काढलं असेल तर ते गाणं आकाशवाणीवर लावतील का? आजही मी आकाशवाणी, दूरदर्शन, टीव्हीवर ऐकतो. हे गाणं आमच्या ह्रदयात आहे. मंगेशकर भगिनी तसंच ह्रदयनाथ मंगेशकरांनी हे गाणं फार वरती नेऊन ठेवलं आहे. आमची सावकरांची भक्ती आहे. आमची नौटकं नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली. गोव्याच्या निवडणुकीमुळे हा उल्लेख झाला असावा का असं विचारण्यात आलं असता राऊत म्हणाले, “ते महान पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी कोणी झालं नाही आणि नंतर होणार नाही असं दिसत आहे. मी त्यांचा आदर करतो. ते मोठे नेते आहेत. मला त्यांच्याविषयी काही फार बोलायचं नाही”. किरीट सोमय्या आणि इतर खासदार कोविडमधील भ्रष्टाचारासंदर्भात गृहसचिवांची भेट ङेणार आहेत. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “त्यांना आंतरराष्ट्रीय कोर्टात जावं. मग गंगेत जी प्रेतं वाहून गेली त्यासंबंधी कोणाकडे तक्रार करायची? त्यासंबंधी हे शिष्टमंडळ कोणत्या कोर्टात जाणार आहे हे आम्हाला कळलं तर बरं होईल”.

“महाराष्ट्राची बदनामी झाली असल्याने मी तिथे जाऊनच बोलणार आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा, कमी लेखण्याचं, मराठी माणसाला अपमानित करण्याचं, मुंबईचं महत्व कमी करण्याचं जे उद्योग सुरु आहेत त्याविरोधात प्रत्येक मराठी माणसाने आणि नेत्याने निर्भयपणे बोललं पाहिजे. ही बाणेदारपणाची मशाल कोणापुढेही न झुकता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेली पाहिजे. आम्ही ती नेत असल्याने ते घाबरले आहेत. आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर विस्तार करत असल्याची त्यांना भीती आहे. त्या भयापोटी आमच्या मागे राक्षस लावले जातात. पण राक्षसाचा अंत होतो. जर हे हिंदुत्ववादी असतील तर यांना कळलं पाहिजे. राक्षसाचे कोथळे काढले जातात, वध केला जातो. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. उलट मी तर उत्तेजन देतो की तुम्ही अशाप्रकारे अजून दमणचक्र करा म्हणजे महाराष्टर तुमच्याविरोधात एकवटेल,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button