वाकडमधील सोसायटीधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप मैदानात; प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली पाहणी
![Wakad, questions from society holders, MLA, Ashwini Laxman Jagtap, in the ground, on the spot inspection,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Aswini-Jagtap-780x470.png)
पिंपरी: आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी प्रभाग क्रमांक २५, वाकडमधील गृहनिर्माण सोसायटांच्या प्रश्नांसंदर्भात महापालिकेचे अधिकारी आणि सोसायट्यांमधील नागरिकांना सोबत घेऊन जागेवर जाऊन पाहणी केली. या गृहनिर्माण सोसायट्यांना येणाऱ्या अडचणी आणि समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. वाकडमधील सोसायट्यांच्या समस्या व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे तेथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या या पाहणी दौऱ्यावेळी भाजपचे चिंचवड विधआनसभा निवडणूक प्रभारी संतोष कलाटे, रणजीत कलाटे, स्नेहा कलाटे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, संदीप कस्पटे, भाजपचे उपाध्यक्ष राम वाकडकर, महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीयुत देसले तसचे जलनिस्सारण, स्थापत्य व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी अधिकाऱ्यांसमवेत वाकडमधील विविध सोसायट्यांमध्ये जाऊन विविध कामांचा पाहणी दौरा व समस्यांवर चर्चा केली. पनाश सोसायटी, शिवांजली सोसायटी, यश व्हीसटेरीया व गणेश इम्पेरिया सोसायटीमध्ये जाऊन अधिकाऱ्यांसमवेत चालू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची पाहणी केली. चालू कामांबाबत नागरिकांना येत असलेल्या अडचणी समजून घेत तत्काळ अधिकाऱ्यांना कामात सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी नागरिकांनी नाल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या सांगितल्या.
आमदार जगताप यांनी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करून नाल्यात सोडण्यात येणाऱ्या सांडपाणी तात्काळ बंद करण्याबाबत सूचना केली. नाल्यावर बांधण्यात आलेले लेबर कॅम्पचे शौचालय त्याचप्रमाणे बुजवलेला नाला मोकळा करण्यासही त्यांनी सांगितले. नाला गाव नकाशाप्रमाणे आहे का की त्याच्यावर कोणी अतिक्रमण केले आहे याची खात्री करण्यासही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. सांडपाण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने संबंधित विभागास त्यांनी निर्देश दिले.