मिशन PCMC : भाजपाकडून इच्छुक उमेदवारीसाठी ‘रेकॉर्ड ब्रेक’ नोंदणी!
मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयातून तीन दिवसांत 820 अर्जांचे वितरण : शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा महापालिकेवर पुन्हा ‘कमळ’ फुलवण्याचा निर्धार
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांचे बिगुल वाजताच भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयातून अवघ्या तीन दिवसांत 820 हून अधिक अर्जांचे वितरण करण्यात आले असून, उमेदवारीसाठी ‘कमळ’ हा पहिला पसंतीक्रम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच पिंपळे सौदागर येथे झालेल्या आढावा बैठकीत, इच्छुकांनी कार्यालयातून अर्ज घेऊन त्यांची छाननी करून प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्याच्या सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या सूचनेनंतर इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी इच्छुकांसाठी अर्जांचे विनामूल्य वितरण करण्याचा निर्णय घेतला. हा उपक्रम पक्षातील पारदर्शकता आणि शिस्तबद्ध प्रक्रियेचे उत्कृष्ट उदाहरण ठरल्याने इच्छुकांनी त्यांचे कौतुक केले.
महामंत्री मधुकर ब. बच्चे यांनी सांगितले की, अर्ज वितरणाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि सुगम झाली. “इच्छुकांचे सहकार्य आणि माझ्या सहकाऱ्यांची साथ मोलाची ठरली,” असे ते म्हणाले.
‘अब की बार, 100 पार’चा नारा…
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपाने ‘अब की बार, 100 पार’ हा नारा दिला आहे. 32 प्रभागांमध्ये एकूण 128 जागा असून, त्यासाठी आरक्षणनिहाय अर्ज वितरण सुरू आहे. पक्षात शिस्त, संघटन आणि टीमवर्क या बळावरच भाजपाची कामगिरी ठळकपणे वाढत असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पक्षश्रेष्ठींचे निवडणुकीच्या कामकाजाकडे बारीक लक्ष आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांमुळे आणि राष्ट्रहिताच्या निर्णयांमुळे लोकांचा भाजपावर अधिक विश्वास निर्माण झाला आहे. आमदार, माजी खासदार, वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले आहेत. या निवडणुकीत आम्ही शंभर पार करणारच; महापौर हा भाजपाचाच असेल,” असा ठाम विश्वास आहे.
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.




