breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरीत मध्यरात्री थरार: कारचोर आणि पोलिसांमध्ये चकमक; एका पोलिसावर चाकूने वार

पिंपरी : कार चोरी करून पळून जाणारे दोन चोरटे आणि रात्र गस्तीवरील तीन पोलिसांमध्ये चकमक उडाल्याची घटना घडली आहे. कार चोरांना थांबवून गाडीची चावी काढून घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर चोरट्यांनी चाकूने वार केला. तर, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आणि चोरट्यांना पकडण्यासाठी चोरट्यांवर पिस्तूल रोखले. मात्र, अंधाराचा फायदा घेत दोन्ही चोरटे डोंगराच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास निगडी-देहूरोड रस्त्यावर हे नाट्य घडलं आहे.

यमुनानगर परिसरातून शुक्रवारी रात्री चोरट्यांनी इको स्पोर्ट्स कार चोरली. याच दरम्यान रात्र गस्तीवर असणारे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड चिखली पोलीस ठाण्यात नोंद करुन रात्र गस्तीसाठी निगडीच्या दिशेने निघाले होते. तेव्हा कारच्या मूळ मालकाने पोलिसांची गाडी पाहिली आणि गाडी थांबवून आपली कार चोरीला गेल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी कारचा क्रमांक, रंग आणि इतर माहिती घेत कारचा शोध सुरू केला.

जोगदंड यांनी याबाबत कंट्रोलला फोन करुन माहिती दिली आणि नाकाबंदी लावण्यास सांगितले. त्यानंतर जोगदंड आणि त्यांच्यासोबत असणारे पोलीस अंमलदार निशांत काळे आणि प्रदीप गुट्टे हे भक्ती-शक्ती चौकातून जात असताना त्यांना चोरीला गेलेली इको कार दिसली. त्यामुळे पोलिसांनी आपल्या गाडीच्या लाईट्स बंद करून संबंधित चोरीच्या कारचा पाठलाग सुरु केला. मात्र, चोरे कार वेगाने पळवत असल्याने ते पोलिसांच्या टप्प्यात येत नव्हते.

दरम्यान निगडी-देहूरोडच्या सीमेवर समोर एक ट्रक असल्याने चोरट्यांनी कारचा वेग कमी केला. त्यावेळी पोलिसांनी आपली गाडी या चोरीच्या कारला आडवी लावली. त्यानंतर पोलीस निरीक्षक जोगदंड हे वेगाने गाडीच्या खाली उतरून चोरट्यांकडे धावले. त्यांनी कारच्या खिडकीतून आत हात घालत चावी काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या हातावर मारहाण केली. त्याच वेळी पोलिस कर्मचारी काळे आणि गुट्टे यांनी कारला दोन्ही बाजूने घेरले. चोरट्यांनी त्यांच्याकडील चाकूने पोलिसांवर वार केला. जोगदंड यांनी स्वतःवरील वार वाचवला. मात्र, एका पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताच्या बोटाला इजा झाली. त्यानंतर कारमध्ये आणखी दोन मोठे चाकू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले.

कारमधील हत्यारे पाहून पोलीस सावध झाले. जोगदंड यांनी परस्थितीचा आढावा घेत आपली पिस्तूल बाहेर काढून चोरट्यांवर रोखली. मात्र, चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांना धक्का मारत पळ काढला. पोलिसांनीही त्यांचा पाठलाग केला. मात्र, अंधार असल्याने चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून त्यातून चोरीसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.

रात्री घडलेल्या या सगळ्या प्रकाराबाबत खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांनी माहिती दिली आहे. ‘रात्र गस्त सुरू असताना रस्त्यावरच एका व्यक्तीने थांबवून आपली कार चोरीला गेल्याचे सांगितले. त्यानुसार शोध घेत असताना चोरीची कार दिसून आली. चोरीच्या कारचा पाठलाग करत चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मोठ्या चाकूने पोलिसांवर वार केला. पिस्तूल रोखल्याने चोरटे हत्यार टाकून अंधाराचा फायदा घेत पळून गेले,’ असं अजय जोगदंड यांनी सांगितलं आहे.

पोलीस आयुक्तांची घटनास्थळी धाव

कारचोर आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घडलेल्या सर्व प्रकारची माहिती घेतली. तसंच पोलिसांनी केलेल्या कामगिरीबाबत पोलीस निरीक्षक आणि दोन्ही पोलीस अंमलदारांचे कौतुक करुन शबासकी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button