‘छावा’ चित्रपटावर बंदी घाला; मौलाना शहाबुद्दीन रझवी यांची मागणी

Maulana Shahabuddin Razvi | नागपुरात झालेल्या दंगलीला ‘छावा’ चित्रपटच जबाबदार आहे. या चित्रपटावर बंदी आणावी, तसेच ‘छावा’चे निर्माते, दिग्दर्शक, लेखक यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रिजवी यांनी केली आहे. याबद्दल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे.
मौलाना शहाबुद्दीन रिजवी म्हणाले, की छावा चित्रपटात औरंगजेबाचे चित्रण ज्यापद्धतीने करण्यात आले, त्यावरून तरूणांची माथी भडकवली जात आहेत. ज्यामुळे अशांतता निर्माण होत असून नागपूरमध्ये दंगल उसळण्यास सदर चित्रपट कारणीभूत आहे. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून देशातील वातावरण बिघडत चालले आहे. छावा चित्रपटात मुघल शासक औरंगजेबाची प्रतिमा हिंदूविरोधी दाखवून हिंदू तरूणांना भडकवले जात आहे. त्यामुळेच हिंदू संघटनांचे नेते विविध ठिकाणी सम्राट औरंगजेबाबद्दल द्वेषपूर्ण भाषणे देत आहेत.
हेही वाचा : एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्याची AI पॉलिसी; माहिती व तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांची मोठी घोषणा
भारतातील मुस्लीम औरंगजेबाला आपला आदर्श किंवा नेता मानत नाहीत. आम्ही त्याला फक्त मुघल शासक मानतो, त्यापेक्षा अधिक काही नाही. तसेच नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी आवाहन केले होते. त्या परिसरातील उलेमा आणि इमाम यांना संपर्क साधून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छावा चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांवरही कायदेशीर कारवाई करावी, असंही मौलाना शहाबुद्दीन रिजवी म्हणाले.