मनोज जरांगे पाटलांचा टोकाचा निर्णय: उद्यापासून पाणी पिणं बंद करणार, मराठा आंदोलनाची धग वाढणार!
राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष: महाराष्ट्रातील मराठा आंदोलन अधिक तीव्र होणार!
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर मागील तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता आंदोलनाच्या लढ्यात आणखी एक आक्रमक पाऊल उचलले आहे. त्यांनी उद्यापासून पाणी पिणंही बंद करण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीला आता आणखी तीव्र स्वरूप प्राप्त होणार आहे.
आंदोलनाची धग वाढली, राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत दाखल
राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून, आझाद मैदानावर मोठा जमाव जमला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनात आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आवाहन केलं आहे की, “तुमच्या गाड्या पार्किंगमध्ये ठेवा आणि रेल्वेने आझाद मैदानात या. गरिबांसाठी अन्नछत्र चालवा, परंतु त्यातून पैसा मागू नका. गरीब मराठ्यांचे शोषण करणाऱ्यांची नावं मी थेट मिडीयात घेईन.”
मनोज जरांगे पाटील यांची स्पष्ट मागणी:
-
मराठा आणि कुणबी एकच आहेत, हे अधिकृतपणे मान्य करून त्याची अंमलबजावणी करा.
-
हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटिअर लागू करा.
-
ज्यांच्या कुणबी नोंदी उपलब्ध आहेत, त्यांच्या सगे-सोयर्यांनाही कुणबी मान्यता द्या.
-
मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या.
-
आम्हाला कायद्यात बसणारं, टिकाऊ आरक्षण द्या.
“दादा असशील का पादा…”: भ्रष्ट नेत्यांवर थेट आरोप
पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे थेट आरोप करत, नावं घेण्याचा इशाराही दिला. “तू रेनकोट वाटले आणि कोणाकडून पैसे घेतले, हे मला माहिती आहे,” असं म्हणत त्यांनी काही नेत्यांना कडक इशारा दिला. “मराठ्यांनी कोणालाही पैसे देऊ नयेत,” असं आवाहन त्यांनी केले.
आरक्षणाच्या लढ्याला निर्णायक वळण
उद्या जरांगे पाटील पाणी पिणं थांबवत असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे आंदोलन सरकारसमोर एक गंभीर नैतिक प्रश्न उभा करत आहे. राज्य सरकार आणि प्रशासनाकडून अजून ठोस प्रतिसाद आलेला नसल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वादळाच्या केंद्रस्थानी आला आहे.




