‘आरक्षण घेण्यासाठी सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही’; मनोज जरांगे पाटलांचं सूचक विधान
![Manoj Jarange Patil said that there is no option but to go to power to get reservation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Manoj-Jarange-Patil-2-780x470.jpg)
Manoj Jarange Patil | मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटलांच्या या मागणीला विरोध दर्शवला आहे. अशातच मनोज जरांगे पाटलांनी महायुती सरकारला पुन्हा एकदा सूचक इशारा दिला आहे. आरक्षण घेण्यासाठी आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, आता सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही, असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, सर्वच पक्षांच्या मराठा समाजाच्या आमदारांनी त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. आमचं हक्काचं ओबीसीमधून आरक्षण आम्हाला द्या. कारण आरक्षण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सध्या सत्तेत ते आहेत. ते जर देणार नसतील तर आमच्यासमोर आरक्षण घेण्यासाठी दुसरा पर्याय काय? आता आमच्यापुढे एकच पर्याय, सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. गोरगरीबांना देणारं बनल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्हाला नाव ठेवायचं नाही की, तुम्ही राजकारणात गेला आहात. एवढ्या वेळेस सत्तेत जायची संधी आहे. राजकारण्यांना पायाखाली तुडवायची ही योग्य वेळ आहे.
हेही वाचा – ‘ऑलिम्पिकमध्ये यश मिळण्यासाठी खेळाडूंवर लक्ष केंद्रित करा’; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
गेल्या काही दिवसांपासून राजकारण ढवळून निघालेलं नाही तर ढवळून काढलं आहे. सरकारने सत्तेचा गैरवापर केला आणि मराठ्यांच्या अंगावर ओबीसींचे नेते घातले. अशा प्रकारची सत्ता कधीही याआधी लोकांनी पाहिली नव्हती, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच, मला मराठा समाजाविरोधात बोललं की सहन होत नाही. त्यामुळे त्यांनी सर्वांनी मिळून मला टार्गेट करायचं ठरवलं. त्यांना माहिती आहे की समाजाच्या प्रश्नांसाठी हा ताकदीने लढतो. याला तेथून बाजूला करायचं. त्यामुळे हे सर्व एकत्र आले आहेत. माझ्या विरुद्ध सर्वांनी षडयंत्र रचलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अशा पाच ते सहा टोळ्या उभ्या केल्या आहेत. पण त्याचा काहीही फायदा होणार नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.