‘मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा अन्यथा..’; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
![Manoj Jarange Patil said that the issue of Maratha reservation should be resolved before the implementation of the code of conduct](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Manoj-Jarange-Patil-3-780x470.jpg)
Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला गंभीर इशारा दिला आहे. निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली मराठ्यांना न्याय दिला नाही तर मग यांना आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. मी महाराष्ट्राच्या समाजाला हे सांगतो आहे की आचारसंहितेच्या नावाखाली मराठ्यांचे प्रश्न दाबले जात आहेत, असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या नाराजीची लाट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना अंगावर घ्यायची नसेल तर त्यांना सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागेल. अन्यायकारक निर्णय लादून चालणार नाही. सात महिन्यांपासून मराठे रस्त्यावर आहे. त्यांची चेष्टा करु नका अन्यथा समाजाला नाईलाजाने निर्णय बदलावा लागेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी बाकी आहे. निवडणूक पुढे ढकलली जाईल असं वाटतं आहे. आमच्या बाजूने निर्णय झाला नाही तर आम्हालाही निर्णय घ्यावा लागेल.
हेही वाचा – पुण्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बदली, राजेंद्र भोसले नवे आयुक्त
आता सरकार नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. आम्ही ज्यांना मोठं केलं त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या. आत्ताच्या राजाला स्वार्थ आणि सत्ता दिसते आहे. अन्यायकारक निर्णय झाले तर आम्ही शांत बसणार नाही. राजकारण्याचा सर्वाधिक जीव गुलालात असतो. आता हे असं वागणार असतील तर गुलाल यांना आयुष्यभर लागू द्यायचा की नाही हे मराठा समाजाला ठरवावं लागेल, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.