‘२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास..’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
![Manoj Jarange Patil said that if reservation is not given by December 24, he will call a protest](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Manoj-Jarange-Patil-1-3-780x470.jpg)
Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. यावरून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास आंदोलन पुकारणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्य सरकारने दिलेल्या फेब्रुवारीपर्यंत आम्ही थांबणार नाही. २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर पुन्हा आंदोलन पुकरणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. १९६८ पर्यंतच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना सगळ्यांना आरक्षणाचा लाभ देणार आहेत. परंतु तुम्ही ते नातं कसं धरणार? तो प्रश्न आहे. त्याच्यासाठी सरकारने कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा – ‘वाल्हेकरवाडी गृह प्रकल्पातील पहिल्या लॉटरीत ११५ लाभार्थींना घरांच्या चाव्या देणार’; मंत्री उदय सामंत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण मिळवून द्यायचं आहे. राज्य सरकार सर्व शक्ती पणाला लावत आहे. राज्य मागासवर्ग महिन्याभरात आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर त्यांचं अवलोकन केलं जाईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधी मंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी देतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.