काही ठिकाणी लढणार, काही ठिकाणी पाडणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
![Manoj Jarange Patil said that he will fight in some places and demolish in some places](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Manoj-Jarange-Patil--780x470.jpg)
Manoj Jarange Patil | राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांनी आज (२० ऑक्टोबर) अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.
मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की नाही? या कौल मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विचारत त्यांचं मत जाणून घेतलं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली. ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील त्या ठिकाणी उमेदवार द्यायचा. तसेच जो मतदारसंघ राखीव असेल त्या ठिकाणी जर उमेदवार आपल्या विचाराचा असेल तर त्या उमेदवाराला आपण मदत करायची. त्या ठिकाणी आपण उमेदवार उभा करणार नाहीत. मात्र, त्या उमेदवाराकडून ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला समर्थन देईल असं लिहून घ्यायचं, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी आज जाहीर केली आहे.
तसेच आपला उमेदवार कोणत्या मतदारसंघामधून निवडून येऊ शकतो? तसेच कोणत्या मतदारसंघात मुस्लिम-दलीत एकत्र आहेत, ते देखील पाहू. तुम्ही उमेदवारी अर्ज भरा, अर्ज मागे घ्यायच्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की कोणी अर्ज मागे घ्यायचा आणि कोणी अर्ज घ्यायचा नाही. पण तुम्ही उमेदवारी अर्ज भरा. मी समीकरण जुळवतो, असं म्हणत मनोज जरांगे यांनी उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची घोषणा केली आहे.