‘फडणवीसांचा सुफडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही’; आचारसंहिता जाहीर होताच मनोज जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Patil | राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून निवडणूक कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार २० नोव्हेंबर मतदान होणार असून २२ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या पोरांचा आयुष्य बेचिराख करण्याचं काम केलं आहे. मराठ्यांच्या पोरांचा आयुष्य उध्वस्त झालं पाहिजे, यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. ज्या मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं, त्याच मराठ्यांना बेचिराख कसं करता येईल, यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. सत्तेचा वापर देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या विरोधात केला. शिंदे सरकार आपल्याला आरक्षण देईल अशी अपेक्षा मराठा समाजातील गोरगरीब जनतेला होती. मात्र, आता ती अपेक्षा फोल ठरली.
हेही वाचा – सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन निवडणूक यशस्वीपणे पार पाडावी; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
सामाजिक चळवळीत काम करताना असताना वैचारिक मतभेद असतात, पण मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळू द्यायचं नाही, मराठा समाजाचे पोरं मोठे झाले, तर आपलं काय होईल, मराठ्यांची पोरं आरक्षणापासून तसेच नोकऱ्यांपासून शिक्षणापर्यंत वंचित राहिले पाहिजे, हे पोरं भिकारी झाले पाहिजे, हे वचन देंवेंद्र फडणवीस यांनी घेतलं होतं. त्यांनी सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांच्या विरोधात अनेक षडयंत्रे रचली. त्यांची चाल आता यशस्वी झाली, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
आत्तापर्यंत निर्णय घेणे हे देवेंद्र फडणवीसांच्या हातात होतं. सत्ता त्यांच्या हातात होती. म्हणून त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही. उलट मराठ्यांना डिवचण्यासाठी मुद्दाम १७ जातींचा समावेश ओबीसीत केला, पण मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. तेव्हाच आम्हाला लक्षात आलं की माणसं आपल्याला मराठा आरक्षण देणार नाही. अखेर त्यांच्या पोटात जे होतं, ते आता बाहेर आलं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणीस यांना मराठ्यांचे वाटोळं करायचं होतं. आम्ही मराठ्यांना मोजत नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, हा सत्ताधारी म्हणून त्यांचा निर्णय होता. मात्र, आता त्यांना मत द्यायची की नाही, हे मराठा समाजाच्या हाती आहे. सत्तेत असूनही देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.