‘‘शासन आपल्या दारी’’ च्या यशस्वीतेसाठी सकारात्म्क योगदान द्या!
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे आवाहन
![Mahesh Landge said that the government should contribute positively for the success of our door](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/mahesh-landge-1-780x470.jpg)
भोसरीत शासकीय अधिकारी आणि स्वयंसेवकांची आढावा बैठक
पिंपरी । प्रतिनिधी
शासकीय कार्यालयांमध्ये आलेल्या नागरिकांना मोकळ्या हाताने परत जावे लागू नये. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. महसूल विभागाशी संबंधित सर्व कार्यालयांनी दक्षता घेतली पाहिजे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकारात्मक भूमिकेतून कामकाज केले पाहिजे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले.
भोसरी विधानसभा मतदार संघांतर्गत ‘‘शासन आपल्या दारी’’ हा उपक्रम आयोजित केला आहे. दि. १ जून ते १२ जून २०२३ पर्यंत मतदार संघातील विविध ८० ठिकाणी विविध योजनांचे अर्ज संकलन करण्यात येणार आहे. तसेच, दि. १५ जून २०२३ रोजी एकत्रितपणे लाभार्थींना दाखल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरूवात झाली असून, विविध शासकीय विभागाचे अधिकारी आणि स्वयंसेवक, पदाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी आमदार लांडगे बोलत होते.
यावेळी पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार डॉ. अर्चना निकम, अन्न धान्य वितरण विभागाचे नायब तहसीलदार नागनाथ भोसले, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अर्चना देशपांडे, संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार निलीमा थेऊरकर, अ-परिमंडळ विभागाचे सचिन काळे, माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नितीन लांडगे, माजी नगरसेवक दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.
हेही वाचा – Whatsapp New Update : व्हॉट्सअॅप आणणार ‘हे’ जबरदस्त फीचर..
अनेकदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील किमान ७५ हजार लाभार्थ्यांना एका छताखाली लाभ देण्यात येणार आहे. या योजनांचा लाभ कमीत-कमी कागदपत्रे आणि जलद मंजुरी अशा सूत्राने देण्यात येत आहे, अशी माहिती अभियानाचे समन्वयक अनिकेत गायकवाड यांनी दिली.
तलाठी कार्यालयाला खडे बोल सुनावले…
महसूल विभागाशी संबंधित तलाठी कार्यालयात नागरिक दाखल्यासाठी येतात त्यांना मोकळ्या हाताने परत जावे लागणार नाही याची दक्षता घ्यावी. माझ्या कार्यालयातून प्रत्येक महिन्याच्या १५ व ३० तारखेला या ८० केंद्रामधून जमा होणारे अर्ज आणि देण्यात येणारे दाखले याबाबत आढावा घेतला जाईल. ‘शासन आपल्या दारी योजना’ च्या माध्यमातून मिळणारे लाभ, योजना काय-काय असतील, सर्व योजना या विषयी संपूर्ण माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका ठेवावी, अशा सूचना आमदार लांडगे यांनी दिल्या.
विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कक्षाची मागणी…
इयत्ता दहावी- बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र कक्ष दाखले वाटपाकरिता करता सुरू करण्यात यावा जेणेकरून विद्यार्थ्यांना एका फेरीमध्येच दाखले मिळण्यात येतील. अनेक विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना सरकारी कार्यालयाचे उंबरठ्याची झिजवावे लागतात ‘शासन आपल्या दारी’ ही योजना तळागाळातील व्यक्ती पर्यंत तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत याचा लाभ कसा देता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न गरजेचे आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व मंडल अधिकारी सर्व तलाठी तसेच तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे सोबत नागरिकांना येणाऱ्या प्रमुख समस्येबाबत पुन्हा बैठक आयोजित करणार आहे. याद्वारे अभियान यशस्वी करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघातून तब्बल ८० अर्ज स्वीकृती केंद्र तयार केलेला आहेत. या माध्यमातून नागरिकांना अर्ज मिळून व त्या योजनेची पूर्तता करून आपला अर्ज आपल्या घराजवळील केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. प्रत्येक केंद्रामधून प्रत्येकाने ६०० अर्जाचे उद्दिष्ट ठेवावे. जेणेकरून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकांना दाखले वाटप आणि लाभार्थींचा उच्चांक आपल्याला गाठता येईल. केवळ १५ दिवसच नाही, तर ‘शासन आपल्या दारी’ ही योजना निरंतर आपल्या मतदार संघात राबवाची आहे.
महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.