बेघर, गोरगरिबांना मिळाले हक्काचे घर; म्हणून देऊया महायुतीला साथ!
भाजपा आमदार महेश लांडगे यांचे शिरुर मतदार संघात आवाहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Mahesh-Landge-1-780x470.jpg)
४ कोटींहून नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या सरकारला पाठिंबा द्या
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
‘सर्वांसाठी घर’ या संकल्पनेतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री आवास योजना’ च्या माध्यमातून देशातील तब्बल ४ कोटीहून अधिक नागरिकांना हक्काचे घर मिळाले. पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल १९ हजार घरे या योजनेतून निर्माण झाली आहेत. गोरगरिबांना निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रभावी धोरण ठरवणाऱ्या मोदी सरकारला आणि शेवटच्या घटकाचा विकास अजेंडा राबवणाऱ्या महायुतीला साथ देऊया, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शिरुर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय-रासप व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
हेही वाचा – ‘नाटकाच्या कामातून खासदारांना वेळ मिळेना’; अजित पवारांचा अमोल कोल्हेंना टोला
दरम्यान, भोसरी विधानसभा मतदार संघात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांच्या प्रचारसाठी भोसरीतील गावजत्रा मैदान येथे दि. १० मे रोजी जाहीर सभा होणार आहे. त्यानिमित्ताने भोसरीतील महायुतीने प्रचार आणि सभेच्या तयारीसाठी कंबर कसली आहे.
आमदार लांडगे म्हणाले की, केंद्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून राज्यातील शहरी भागात एकूण १ हजार ६३२ प्रकल्पांतून १३ लाख ६४ हजार ९२३ घरांसाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यापैकी ११ लाख १६ हजाराहून अधिक घरांच्या कामाला सुरुवात झाली आहे. ८ लाख ३९ हजाराहून अधिक घरे पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या माध्यमातून झोपडपट्टीवासीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती, अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती, या योजनेखाली पात्र ठरविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
‘शेवटच्या घटकाचा विकास’ हाच भाजपा प्रणित केंद्र व राज्यातील महायुती सरकारचा विचार आहे. ‘सर्वांसाठी घर’ या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना हक्काचे घर मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही योजना जिव्हाळ्याचा विषय असून, आगामी काळात देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काचा निवारा मिळेल, असा संकल्प आहे. किसान सन्मान योजना, मोफत अन्नधान्य योजना, आयुष्यमान योजना, जनधन, उज्ज्वला योजना अशा विविध योजनांद्वारे गोरगरिब जनतेच्या हिताचा विचार करणाऱ्या मोदी सरकारला आणि महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, निवडणूक प्रमुख, शिरुर लोकसभा, भाजपा.