‘सामान्य व्यक्तीच्या घरीही ४-५ कोटी सापडू शकतात’; भाजप आमदाराचं विधान
![Madal Virupakshappa said that 4-5 crores can be found even in a common person's house](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Madal-Virupakshappa-780x470.jpg)
६ कोटी ही काही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही
गेल्या आठवड्यात कर्नाटकमधील भाजपाचे आमदार मडल विरूपक्षप्पा यांच्या मुलाला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांच्या घरी टाकलेल्या छाप्यातली कोट्यावधींचं घबाड सापडलं. यानंतर विरूपक्षप्पा गायब झाले होते. अखेर जामीन मंजूर केल्यानंतर ते पुन्हा सगळ्यांसमोर आले. यावेळी दिलेल्या प्रतिक्रियेत विरूपक्षप्पा यांनी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मला १०० टक्के खात्री आहे की या प्रकरणात मी निर्दोष सिद्ध होईन. माझ्या घरात सापडलेली रक्कम लाचेच्या माध्यमातून जमा केलेली नाही. कौटुंबिक व्यवसाय आणि शेतीतून आलेला तो पैसा आहे. आमचा सुपारी उत्पादनाचा व्यवसाय आहे. माझ्याकडे सुपारीचं १२५ एकर शेत आहे. इतरही व्यवसाय आहेत. मी त्याचे पुरावे सादर करून माझे पैसे परत घेईन, असं विरूपक्षप्पा म्हणाले.
चन्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुपारीचा व्यवसाय होतो. त्यामुळे सामान्य व्यक्तीच्या घरीही ४-५ कोटी सापडू शकतात. आमचे खूप सारे व्यवसाय आहेत. त्यामुळे ६ कोटी ही काही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. मी यासंदर्भात लोकायुक्तांना योग्य ती कागदपत्र सादर करेन, असंही विरूपक्षप्पा म्हणाले.