breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

#Lockdown: “योगीजी, महाराष्ट्रावर बिनबुडाचे आरोप करण्याआधी ‘या’ प्रश्नांची उत्तरे द्या”; रोहित पवारांचा हल्लाबोल

घाम गाळून महाराष्ट्र उभा करणाऱ्या मजुरांना शिवसेना-काँग्रेस सरकारने फसवल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला होता. याच टीकेवरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी योगी यांना काही प्रश्न विचारले आहेत.  लॉकडाउन काळात मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी भाग पाडण्यात आलं. यासाठी उद्धव ठाकरेंना कधीही माफ केलं जाणार नाही असं म्हणणाऱ्या योगींवर रोहित यांनी ट्विटवरुन टीका केली आहे. यामध्ये रोहित यांनी महाराष्ट्राने या मजुरांची कशाप्रकारे काळजी घेतली हे सांगतानाच कामगारांवर फवारणी कोणी केली हे साऱ्या जगाने पाहिल्याचा टोलाही लगावला आहे.

योगी काय म्हणाले होते?

घाम गाळून महाराष्ट्र उभा करणाऱ्या मजुरांना शिवसेना-काँग्रेस सरकारने फसवलं आहे. लॉकडाउन काळात मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी भाग पाडण्यात आलं. यासाठी उद्धव ठाकरेंना कधीही माफ केलं जाणार नाही, अशा आशयाचं ट्विट योगी आदित्यनाथ यांनी रविवारी केलं होतं.

रोहित पवार यांचे उत्तर

योगी यांच्या याच ट्विटला कोट करुन रोहित पवार यांनी या विषयावरुन उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. रोहित यांनी काही ट्विट केले असून त्यामध्ये अगदी उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश नाकारण्यात आलेल्या मजुरांच्या व्हिडिओपासून ते उत्तर प्रदेश सरकारला सवाल करण्यासंपर्यंत अनेक मुद्द्यांचा रोहित यांनी उल्लेख केला आहे. “महाराष्ट्राच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्थलांतरित मजुरांनी जेव्हा घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा राज्य सरकारने मुख्यमंत्री निधीमधून पैसे देत त्यांच्या प्रवासाची व्यवस्था केली. योगीजी आज या कामगारांची काळजी घेताना त्यांच्या चाचण्या घेणे आणि त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करणे या दोन महत्वाच्या गोष्टी आहे. महाराष्ट्र सरकारने अतिथि देवो भवनुसार या मजुरांना देण्यात आलेल्या सुविधांबद्दल तुम्ही याच मजुरांनी केलेल्या महाराष्ट्र सरकारच्या कौतुकाचा व्हिडिओ पाहिला असेल नसेल. नसेल पाहिला तर हा पाहा,” असं म्हणत रोहित यांनी एक व्हिडिओही ट्विट केला आहे.

सर्व जगाने पाहिले की तुमच्या सरकाने या मजुरांवर औषधांची फवारणी करत या लोकांना प्राण्यांसारखी अमानुष वागणूक दिली. जर तुम्हाला त्यांची इतकीच काळजी आहे तर पोट भरण्यासाठी त्यांना एवढ्या वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये कोण आणि का आणत होतं?, सुरुवातीला त्यांना स्वत:च्या राज्यात येण्यापासून कोण आडवत होतं? या मजुरांसाठी रेल्वेसेवा सुरु करावी असं महाराष्ट्र सरकारने म्हटलं होतं. मात्र त्याचा स्वीकार न करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात तुम्ही आवाज का उठवला नाहीत? या प्रश्नांची उत्तरेही तुम्ही द्यावीत,” असं रोहित यांनी म्हटलं.

लॉकडाउन काळात आपल्या घरी परतणाऱ्या कामगारांवरुन शिवसेना आणि भाजपा या दोन जुन्या मित्रपक्षांमध्ये सध्या चांगलंच राजकारण रंगताना दिसत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी सामना या वृत्तपत्रात, परप्रांतीय कामगारांना भोगाव्या लागणाऱ्या त्रासावरुन उत्तर प्रदेश सरकारचे कान टोचले होते. त्यानंतर रविवारी योगी यांनी उत्तर प्रदेशमधील कामगार हवे असल्याच आता राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा नियम बनवणार असल्याचे सांगितले होते. यावरुनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असं असेल तर महाराष्ट्रात येण्याआधी या मजुरांनाही परवानगी घ्यावी लागेल असे उत्तर योगींना फेसबुक पोस्टमधून दिलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button