लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली; रक्तदाब वाढल्याने हृदयविकाराचा धोका, डॉक्टरांनी दिला इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-92-1-780x470.jpg)
Laxman Hake Health Update | ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. परंतु आता हाकेंची प्रकृती खालावली आहे. पुन्हा एकदा लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावल्याने सरकारने आंदोलनाची त्वरित दखल घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात, अशी भावना पाठिंबा देण्यास आलेल्या ओबीसी बांधवांनी व्यक्त केली आहे.
उच्च रक्तदाबामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने उपचार घेण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र हाकेंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षण बचाव आंदोलना दरम्यान लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून सकाळपासून राज्यभरातून ओबीसी बांधव या ठिकाणी दाखल होत आहे.
हेही वाचा – ‘मनोज जरांगे आणि छगन भुजबळांनी एकत्र यावं’; बच्चू कडूंचं वक्तव्य चर्चेत
‘सगेसोयरे’चा अध्यादेश लागू झाला तर फक्त ओबीसी बाधित होत नाही, तर एससी आणि एसटी यांच्या आरक्षणावर पण गदा येते. शासन जोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही हे लेखी सांगत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार ओबीसी नेते हाके यांनी व्यक्त केला.
तर दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी देखील लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. तसेच सरकारला सर्व आंदोलानांना समान वागणूक देण्याची मागणी केली होती. त्या म्हणाल्या की, “आंदोलन देशात कुणीही करु शकतो. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. या आंदोलनाला कायद्याच्या चौकटीत बसून कसा न्याय देणं हे सरकारचं कर्तृव्य आहे. मी कुठली प्रतिनिधी म्हणून इथे आलेली नाही. तर मला असं वाटलं की, इथेसुद्धा मोठ्या नेत्यांनी येऊन आंदोलकांच्या भावना ऐकून घेतल्या पाहिजेत आणि न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे,” अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली होती.