‘राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली’; किरण मानेंची पोस्ट चर्चेत
![Kiran Mane said that Raj Thackeray made a big move](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Raj-Thackeray-and-Kiran-Mane-780x470.jpg)
मुंबई | अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने सामाजिक, राजकीय अशा विविध विषयांवर आपलं मत मांडत असतात. अशातच आता ब्रिजभूषण कारवाईसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चालबाजी केली असल्याचं किरण माने यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं आहे. तसेच राजकीय नेत्यांना त्यांनी एक सल्ला दिला आहे.
किरण माने नेमकं काय म्हणाले?
“महिला कुस्तीगीरांनी ज्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत त्या ब्रिजभूषणवर कारवाई करा.” अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांना पाठवले आहे असे राज ठाकरेंनी जाहीर केले होते. एक वर्षापूर्वी, ३१ मे रोजी सोशल मिडीयावर ते पत्र पोस्ट केले गेले. ते पत्र प्रचंड व्हायरल झाले होते. “ब्रिजभूषणला आम्ही मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही.” असा इशाराही दिला होता…हा स्टंट असणार असा संशय काहीजणांना आला. ईडीच्या भितीने घाबरलेले राजजी हे धाडस करणार नाहीत अशी बर्याचजणांना खात्री होती. शेवटी माहितीच्या अधिकारात एकाने याविषयी अर्ज करून विचारणा केली. पंतप्रधान कार्यालयाकडून असे उत्तर आले की, “राज ठाकरे यांच्याकडून असे कुठलेही पत्र पंतप्रधान कार्यालयाला आलेले नाही.” केवढी मोठी चालबाजी होती ही!
हेही वाचा – ‘इंडिया आघाडीला २४० ते २६० जागा मिळतील, केंद्रात सत्ताबदल होणार’; पृथ्वीराज चव्हाण
सुषमा अंधारेताईंनी काल अणुशक्तीनगर येथे हा पर्दाफाश केला तेव्हा मी तिथे हजर होतो. उपस्थित प्रचंड जनसमुदायातून “शेSSSम शेSSSSम” असा खुप मोठा आवाज येऊ लागला… लोकांना मनापासून या फसवणुकीचे वाईट वाटलेले दिसले. राजकीय नेत्यांनी कायम एक लक्षात ठेवावे. एकवेळ तुम्ही निष्क्रिय असा, जनता खपवून घेईल… पण खोट्या भूलथापा देऊन जनतेच्या भावनांशी खेळू नका. आधीच या देशातले सर्वसामान्य नोकरदार, छोटे व्यावसायिक, गोरगरीब मजूर, शेतकरी, कष्टकरी आणि महिला नाडले गेलेले आहेत… जगणं हराम झालंय… त्यात तुम्ही असा थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका. बास, असं किरण माने यांनी म्हटलं आहे.