“भाजपच्या मोठ्या नेत्यांनी मला ऑफर दिली होती”; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
![Jitendra Awad said that senior BJP leaders had offered me](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/jitendra-awhad-780x470.jpg)
मुंबई : मी गेल्या ३५ वर्षापासून राजकारणात आहे. ३५ वर्षात दोनदा अशा घटना घडल्यात त्याचा आज मी पहिल्यांदा खुलासा करतो. एकदा मला सकाळी साडे सात वाजता गोपीनाथ मुंडेंचा फोन आला होता. जितेंद्र, तुला आमदार करायचं ठरवलंय, तु तुझ्या बायकोशी बोलून घे आणि मला काय तो निरोप दे, प्रमोद महाजनांशी माझं बोलणं झालंय, तो संध्याकाळी बाळासाहेबांना भेटून तुझी उमेदवारी फिक्स करेल, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी मला खूप म्हणजे खूपच मदत केलीय. त्यांचे उपकार आहेत. माझ्या बायकोने मुंडेंना फोन केला. तुमच्याबद्दल आदर आहे. तुमचे खूप उपकार आहेत. परंतु तो शरद पवारांना सोडू शकत नाही. हा त्याचा विक पॉईंट आहे असं सांगितले. तेव्हा ठीक आहे काही हरकत नाही. तो टॅलेंटेड आहे. त्याला पटकन संधी देऊन टाकली असती. ती माझ्या हातात आहे, असं मुंडेंनी म्हटलं होतं. त्यानंतर जेव्हा जेव्हा गोपीनाथ मुंडे मला भेटले ते तेवढ्याच प्रेमाने बोलायचे असंही आव्हाड म्हणाले.
दरम्यान, केंद्रातील ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कोणत्याही परिस्थीतीत मला अटक होईल. ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत अथवा त्यानंतर काहि महिने जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. माझ्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही पण ही बातमी मिळते तेव्हा आश्चर्य वाटतं, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.