तुम्हाला तिकडे कोण विचारतं? जयंत पाटलांनी शिंदे, फडणवीसांना सुनावलं, अजित पवार म्हणाले..
![Jayant Patil said who is asking you there](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Ajit-Pawar-and-Jayant-Patil-780x470.jpg)
नागपूर : राजस्थान, तेलंगणात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या. यावरून राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत शिंदे, फडणवीसांना चांगलच सुनावलं.
जयंत पाटील म्हणाले, बळीराजा अवकाळी आणि गारपीटीचा मारा सहन करतोय. पण, सत्ताधारी पक्षातील मंत्री शेजारील राज्यांत प्रचारामध्ये गुंतले होते. अन्य राज्यांत प्रचार करण्यास हरकत नाही. इथे आपला संसार फाटायला निघालाय आणि दुसऱ्यांचा संसार जोडायला मंत्री महाराष्ट्राच्या बाहेर पळत आहेत. हे चित्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चांगले नाही.
हेही वाचा – डासांना दूर लावणाऱ्या या ६ वनस्पती घराभोवती लावा, डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत
भाजपाला विजय झाला, याचा आनंद आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा असल्यामुळे मंत्र्यांनी प्रचाराला जाण्याची गरज नव्हती. तुम्हाला तिकडे कोण विचारतं? पंतप्रधानांच्या करिष्यामुळे विजय झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस प्रचारासाठी गेले. पण, अजित पवार प्रचारासाठी गेले नाहीत, असं जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटलांच्या नंतर अजित पवार म्हणाले, आम्ही तिथे जाऊन काय दिवा लावणार आहे? पंतप्रधानांच्या नावावरच उमेदवार निवडून येतात.
लगेच जयंत पाटील म्हणाले, हेच मी सांगतोय, यांनी जाऊन काय दिवा लावलाय? जे दादांना कळलं, ते तुम्हाला कळलं नाही. शेतकऱ्यांचा संसार फाटला आहे आणि सरकारला त्यांच्याकडे पाहायला वेळ मिळाला नाही. मागील हंगाम वाया गेला आहे. हा सुद्धा हंगाम वाया जाण्याची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे. मुलींचं लग्न, शिक्षणाची फी असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभे आहेत.