breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शिल्पकार आपटेचा पत्ता नौदलाला कुणी दिला? जयंत पाटलांचा सवाल

Jayant Patil | मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. महाविकास आघाडीकडून आज मालवण येथे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारकडून नौदलाकडे बोट दाखविले जात आहे. पण शिल्पकार आपटेचा पत्ता नौदलाला कुणी दिला? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

जयंत पाटील म्हणाले, कल्याणमध्ये राहणाऱ्या शिल्पकार जयदीप आपटेचा पत्ता नौदलाला सांगण्याचे काम कुणी केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीच हे काम करून घेतले. नौदलाने फक्त पुतळा पूर्ण करून आल्यानंतर तिथे बसविला. त्यामुळे संपूर्ण दोष राज्य सरकारचा आहे. नौदलाच्या अखत्यारीत असलेल्या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुतळ्याचे बांधकाम करण्यात आले होते. केवळ आठ महिन्यात वादळ-वाऱ्याचा कोणताही अभ्यास न करता पुतळा उभारला गेला. त्यामुळे राज्य सरकारने आता जबाबदारी स्वीकारून राज्याच्या जनतेची माफी मागावी.

हेही वाचा    –    सावधान! पुण्यासह या जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहत असल्यामुळे पुतळा पडला. पण आमच्या माहितीप्रमाणे ताशी २७ किमी वेगाने वारे वाहत होते, त्यापेक्षा अधिक वाऱ्याचा वेग नव्हता. जर वाऱ्याचा वेग अधिक असता तर दोन-चार झाडेही पडली असती, पण तसे न होता फक्त पुतळा पडला. याचा अर्थ पुतळ्याचे काम सदोष होते. पुतळ्याचे स्ट्रक्चर कमकुवत होते, याची चौकशी सरकारने केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामातही सरकारने भ्रष्टाचार केला. अनुभव नसलेल्या, अपरिपक्व अशा माणसाला केवळ आपला मित्र आहे म्हणून काम देण्यात आले. ज्याने दीड-दोन फुटाचे पुतळे बनविले होते, त्याला २८ फुटांचा पुतळा बनविण्याचे काम दिले, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

वाईटातून काही चांगलं घडायचं असेल, असं विधान शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले होते. या विधानाचा समाचार घेताना जयंत पाटील म्हणाले, चांगले एकच घडणार ते म्हणजे हे सरकार पडणार. ज्यांना २८ फुटांचा पुतळा व्यवस्थित उभारता आला नाही, ते आता १०० फुटांचा पुतळा उभारण्याची भाषा करत असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button