आम्ही टप्प्यात आल्यानंतर लगेच कार्यक्रम करतो; जयंत पाटलांचा भाजपला इशारा
![Jayant Patil said that we do the program immediately after the stage](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Jayant-Patil-1-780x470.jpg)
कोल्हापूर | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला कोल्हापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते समरजितसिंह घाडगे हे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका मेळाव्यात जाहीर केलं आहे. यावेळी जयंत पाटील यांनी भाजप आणि हसन मुश्रीफ यांना सूचक इशाराही दिला आहे.
जयंत पाटील म्हणाले, माझ्या डोक्यात असणारी चिंता आज संपत आहे याचा आनंद मी व्यक्त करतो. ज्यावेळी सर्व लोक सोडून जातात तेव्हा सर्व बहुजन समाज कसा एकवटतो हे तुम्ही कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकीत दाखवून दिलं. आता त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला विधानसभेला कागलमध्ये करायची आहे. समरजितसिंह घाटगे यांना आम्ही गेल्या काही दिवसांपासून सुचवत होतो की, आपण या वेगळ्या मार्गाचा विचार करा. हा मार्ग आपल्या ग्रामीण भागातील जनतेला मान्य असणारा मार्ग आहे. लोकांच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांसह सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आज महाविकास आघाडी महाराष्ट्रात एकसंघपणे काम करत आहे. त्यामुळे आपल्याला हा निर्णय लवकर करावा, अशी विनंती मी त्यांना करत होतो.
हेही वाचा – भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
आज सकाळी समरजितसिंह घाटगे यांनी मला मेसेज पाठवला आणि म्हणाले तुम्ही या आणि माझ्या कार्यकर्त्यांशी तुम्ही एकदा बोलले तर बरं होईल. ते म्हणाले उद्या, परवा कधीही या. पण आम्ही टप्प्यात आल्यानंतर लगेच कार्यक्रम करतो. उद्या परवा नाही तर आजच येतो, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपला सूचक इशारा दिला.
या मतदारसंघातील प्रत्येक बूथवरून जास्तीत जास्त लोक आणून आपल्याला ऐतिहासिक न भूतो न भविष्यति अशी सभा आपल्याला 3 तारेखला करायची आहे. समरजित घाटगे यांचं मी पक्षात स्वागत करतो. 3 सप्टेंबरला अधिकृत प्रवेश त्यांचा होईल. त्या प्रवेशानंतर कागल मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दिमाखाने डौलायला लागेल, असंही जयंत पाटील म्हणाले.