‘विधानसभेत शरद पवार गट जास्त जागा लढणार’; जयंत पाटीलांचं विधान

मुंबई | लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. राज्यात सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं विधानसभेची तयारी सुरू केली आहे. अशातच, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या जागा लढवणार, असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
जयंत पाटील म्हणाले, आता साडेतीन-चार महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. आम्ही सर्वच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत मला आपल्या मतदारसंघात जास्त फिरता येईल, असं वाटत नाही. त्यामुळे काय करायचंय ते तुम्हीच करायचं आहे. कारण लोकसभेत मी दहा मतदारसंघ फिरलो, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, फार प्रचंड काम केल्याशिवाय गडी दुरुस्त होत नाही. आकाड घेतला तर टीव्हीवर सुरू होईल, महाविकास आघाडीत राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार, म्हणून मी आकडा घेत नाही.
हेही वाचा – ..तर मोदींचं अहंकारी सरकार १५ मिनिटेही टिकू शकणार नाही; संजय राऊतांचं विधान
दुसरीकडे महायुतीतही विधानसभेच्या जागावाटपावरुन खलबतं सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं विधानसभेसाठी ८० जागांवर दावा केला आहे. अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ८० जागांवर लढवण्याची तयारी असल्याचं म्हटलं होतं.





